नवी दिल्ली :
बिहारमधील विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी दुपारी भाजपाध्यक्ष जे. पी. न•ा यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. जवळपास पाच तासांहून अधिक वेळ ही बैठक सुरू होती. मित्रपक्षतील नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत निवडणूक रणनीती आणि संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे आणि बिहार भाजपचे अनेक वरिष्ठ नेतेही बैठकीला उपस्थित होते.
बिहार विधानसभा निवडणुका जवळ येत असताना जागावाटपावरून वाद सुरूच आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आपल्या हालचाली तीव्र करत आहे. गेल्या तीन दिवसांपासून भाजपने केलेल्या तीव्र प्रयत्नांनंतर अधिक जागांची मागणी करण्यावर ठाम असलेले चिराग पासवान माघार घेत आहेत. तथापि, राष्ट्रीय लोक समता पक्षाचे (आरएलएसपी) प्रमुख उपेंद्र कुशवाहा आपली भूमिका बदलताना दिसत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपेंद्र कुशवाहा त्यांना वाटप करण्यात आलेल्या सहा जागांवर सहमत नसून ते अधिक जागांची मागणी करत आहेत.









