श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे आयोजन : न्याय मिळवून देण्याची ग्वाही, जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस आयुक्तांना निवेदन
बेळगाव : अगरबत्ती व्यवसायाच्या नावाखाली फसवणूक झालेल्या महिलांची बैठक बुधवारी जुने बेळगाव येथील साई भवन कार्यालयात पार पडली. श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी सर्व महिलांचे गाऱ्हाणे ऐकून घेऊन न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली. व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ भातकांडे, शहापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक सिद्धाप्पा सीमानी, सुनील बोकडे, अनिल अंबरोळे, किरण हुद्दार यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील एका भामट्याने बेळगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये फिरून अगरबत्ती पॅकेजिंग व्यवसाय सुरू करून देतो, असे सांगून काही रक्कम उकळली होती.
या उद्योगामध्ये हजारो महिलांचे पैसे अडकले आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्या महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांना निवेदन दिले होते. यावेळी बोलताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले, गोरगरीब महिलांची गृहोद्योगाच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच श्रीराम सेना हिंदुस्थानच्या माध्यमातून देखील न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी बेळगाव शहरासह तालुक्यातील शेकडो महिला या बैठकीमध्ये सहभागी झाल्या होत्या. अनेकांनी आपल्या घरखर्चातील रक्कम पदरमोड करून गृहोद्योग मिळविण्यासाठी सदर व्यक्तीला पैसे दिल्याचे महिलांनी सांगितले. तसेच काहीही करून आम्हाला पैसे परत मिळवून द्या, अशी मागणी महिलांनी केली.









