कोल्हापूर :
गोकुळ चेअरमन बदला संदर्भात गोकुळमधील सत्ताधारी आघाडीचे नेते, संचालक यांची आज महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा बँक अथवा शासकीय विश्रामगृह येथे ही बैठक होईल. दरम्यान शुक्रवारी गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात चेअरमन अरुण डोंगळे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. पण डेंगळे त्यांच्या भुमिकेवर ठाम असल्याचे समजते.
अरुण डोंगळे यांचा चेअरमन पदाचा कार्यकाळ 25 मे रोजी संपत आहे. त्यामुळे डोंगळे यांचा राजीनामा घेण्याबाबत हालचाली सुरु होत्या. डोंगळे यांचा राजीनामा होणार हे निश्चित होते. मात्र अचानक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार राजीनामा देणार नसल्याची भुमिका डोंगळे यांनी घेतली. याबाबतची स्पष्टोक्तीही त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
दरम्यान शुक्रवारी दुपारी चेअरमन डोंगळे गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात आले. यावेळी येथे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अजित नरके, बाबासो चौगले यांच्यासह अन्य काही संचालक ही उपस्थित होते. संचालक पाटील, नरके, चौगले यांनी चेअरमन अरुण डोंगळे यांच्याशी चेअरमन पदाचा राजीनामा देण्याबाबत चर्चा केली. अविश्वास ठराव आणण्याची वेळ येवू देवू नका, ठरल्याप्रमाणे राजीनामा द्या, असे सांगत समजुत काढण्याचा प्रयत्न केला. सुमारे तासभर त्यांच्यामध्ये चर्चा सुरु होती. चर्चेनंतर चेअरमन डोंगळे कार्यालयातून निघून गेले. तर अन्य संचालकांनी शासकीय विश्रामगृह येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली व ताराबाई पार्क कार्यालयात चेअरमन डोंगळे यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली.
- बैठकीचा निरोप नाही, वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाचे पालन
गोकुळ सत्ताधारी आघाडीचे नेते, संचालक यांची आज होणाऱ्या बैठकीबाबत आपणाला कोणताही निरोप आलेला नाही. त्यामुळे बैठकीस उपस्थित राहण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच चेअरमन पदाचा राजीनामा न देण्याबाबत कोण काही म्हणत असले तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसारच चेअरमन पदाचा राजीनामा दिला नसल्याचे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना स्पष्ट केले.








