वृत्तसंस्था /नवी दिल्ली
अमेरिका आणि ईजिप्त या दोन देशांचा पाच दिवसांचा दौरा करुन भारतात परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. सोमवारी दुपारी साधारणत: दोन तास ही बैठक झाली. बैठकीला ज्येष्ठ मंत्र्यांसह विविध विभागांचे महत्वाचे अधिकारीही उपस्थित होते, अशी माहिती देण्यात आली आहे. या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, पेट्रोलियम आणि शहरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच अन्य काही मंत्री उपस्थित होते. पंतप्रधान मोदींच्या सचिवांनीही या बैठकीत भाग घेतला. या बैठकीत गेल्या एक आठवडाभरातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कायदा आणि सुव्यवस्था स्थिती, तसेच आर्थिक घडामोडींसंबंधी पंतप्रधान मोदींनी माहिती घेतली. कच्च्या तेलाच्या आयातीवरही बोलणी झाल्याची चर्चा आहे.









