घरे पडलेल्या कुटुंबीयांची केली विचारपूस
प्रतिनिधी / बेळगाव
बैलहोंगल तालुक्यातील बुडरकट्टी गावामध्ये दोन घरे कोसळली. सुदैवानेच यामध्ये जीवितहानी टळली आहे. ही घटना जिल्हा पोलीसप्रमुख संजीव पाटील यांना समजताच त्यांनी बैलहोंगल तालुक्यातील बुडरकट्टी गावाला भेट देऊन कुटुंबीयांची विचारपूस केली.
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे बैलहोंगल तालुक्यातील बुडरकट्टी येथील दोन घरे कोसळली. त्यावेळी त्या घरांमध्ये दोन वृद्ध महिलांसह काहीजण झोपले होते. आवाज येताच हे सारेजण बाहेर पडले. वृद्ध महिलांनाही तातडीने बाहेर काढण्यात आले. यामुळे सुदैवानेच यामध्ये जीवितहानी झाली नाही. घराच्या पाठीमागील बाजूस जनावरे असल्यामुळे त्यांनाही सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी भेट दिली. घरांच्या पडझडीची माहिती घेऊन तहसीलदारांना पंचनामा करण्याबाबत सूचना केल्या आहेत.









