प्रथमच समुद्रात आयोजन ः संरक्षणमंत्र्यांची उपस्थिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नौदलाची कमांडर्स पातळीवरील परिषद सोमवार, 6 मार्चपासून सुरू होत आहे. ही परिषद पहिल्यांदाच ‘आयएनएस विक्रांत’वर भरसमुद्रात होणार आहे. पाच दिवस चालणाऱया या परिषदेच्या पहिल्या दिवशी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह नौदलाच्या सर्वोच्च कमांडर्सना संबोधित करणार आहेत.
‘आयएनएस विक्रांत’वरील परिषदेत सुरक्षेशी संबंधित लष्करी आणि सामरिक पातळीवर महत्त्वाची चर्चा होणार आहे. याशिवाय नौदलाने गेल्या सहा महिन्यांत केलेल्या ऑपरेशन्स, लॉजिस्टिक, प्रशिक्षण, मानव संसाधन आणि भविष्यातील योजना यावरही चर्चा होणार आहे. यादरम्यान हिंद महासागरातील चीनच्या वाढत्या कारवायांवरही कमांडर्स चर्चा करतील.
नौदलाच्या कमांडर्सची ही परिषद पहिल्यांदाच समुद्रात होणार आहे. यापूर्वी 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयएनएस विक्रमादित्य बोर्डवर संयुक्त कमांडर्स परिषदेला संबोधित केले होते. आयएनएस विक्रांत नौदलात दाखल होऊन सहा महिने उलटले आहेत. सध्या त्यावर तैनात करण्यात येणाऱया लढाऊ विमानांची चाचणी सुरू आहे.









