बेकायदा दारू वाहतूक रोखण्यासाठी मोहीम : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेकपोस्ट उभारणार
बेळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य अबकारी अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र, गोव्यातील अबकारी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी बेकायदा दारू वाहतूक रोखण्यासाठी जांबोटी रोडवरील एका खासगी रिसॉर्टमध्ये तीन राज्यातील अबकारी अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत अबकारी विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. मंजुनाथ, अरुणकुमार, जयरामेगौडा, एन. सी. पाटील, विजयकुमार हिरेमठ, रवी मुरगोड, अनिल नंदेश्वर आदी अधिकारी उपस्थित होते.
गोवा, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, जत, सोलापूरहून आलेल्या अबकारी अधिकाऱ्यांबरोबरच बेकायदा दारू वाहतूक रोखण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांच्या सीमेवर चेकपोस्ट उभारण्याबरोबर अशा प्रकरणात यापूर्वी जाळ्यात आलेल्या आरोपींवर नजर ठेवण्याचे ठरविण्यात आले. निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात बेकायदा दारू वाहतूक केली जाते. खासकरून गोवा आणि दमनमधून साठा कर्नाटकात येतो. तो रोखण्यासाठी शेजारील राज्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून सतत त्यांच्या संपर्कात राहण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.









