गटनेते पदासाठी दोन नगरसेवक इच्छुक
प्रतिनिधी / बेळगाव
महापौर-उपमहापौर निवडणूक सोमवार दि. 6 रोजी होणार असून याबाबत जोरदार तयारी सुरू आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने भाजपचे महापौर-उपमहापौर होणार आहेत. मात्र कोणत्या नगरसेविकांची महापौर-उपमहापौरपदी वर्णी लागणार याबाबत माहिती उपलब्ध झाली नाही. पण विरोधी गटानेदेखील आपले उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असून अपक्ष नगरसेवकांच्या गटामधून गटनेते पदासाठी दोन नगरसेवक इच्छुक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
महापौर-उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटांतर्गत बैठका सुरू असून भाजपच्या कोणत्या नगरसेविकांची महापौर-उपमहापौरपदी निवड करणार याबाबत समजू शकले नाही. मात्र तीन नगरसेविका महापौरपदासाठी इच्छुक असून उपमहापौरपद ओबीसी ‘ब’ महिलेसाठी राखीव असल्याने ओबीसी ‘ब’ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करण्यात आले आहेत.
पण आयकर खात्याकडून ना हरकत दाखला घेऊन ओबीसी ‘ब’ प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी अपक्ष नगरसेवकांनी केली आहे. तसेच मराठी गटामधून वैशाली भातकांडे यांचा उमेदवारी अर्ज उपमहापौरपदासाठी भरण्याची तयारी चालविली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
महापौर-उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटांतर्गत बैठकांना ऊत आला आहे. महापालिकेत 10 नगरसेवक काँग्रेसचे असून 13 अपक्ष आहेत. काँग्रेसच्या नगरसेवकांनी आपली स्वतंत्र बैठक घेतली आहे. तसेच अपक्ष नगरसेवकांची बैठक गुऊवारी झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 13 नगरसेवकांच्या गटामध्ये सहा मराठी भाषिक नगरसेवकांचा समावेश आहे. यावेळी मराठी भाषिक नगरसेवकाला गटनेते पदाची संधी देण्याची मागणी करण्यात आली आहे. तर गटनेते पदासाठी 13 अपक्ष नगरसेवकांमधून दोन नगरसेवक इच्छुक असल्याचे गटाच्या बैठकीवेळी सांगण्यात आले. त्यामुळे एकमत करून याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.









