योजनेपासून वंचित नागरिकांना लाभ मिळवून देण्याची अधिकाऱ्यांना सूचना
प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर तालुका गॅरंटी योजना अंमलबजावणी कमिटीची बैठक येथील तालुका पंचायत सभागृहात शुक्रवार दि. 30 रोजी कमिटीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला कमिटी सदस्य यासह तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी आर. बी. जाधव, बसआगार उपप्रमुख विठ्ठल कांबळे, हेस्कॉमचे अभियंते जगदीश मोहिते, बालकल्याण खात्याचे अधिकारी चंद्रशेखर सुखसारे, अन्नपुरवठा विभागाचे नदाफ यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत सरकारने जाहीर केलेल्या पाच गॅरंटी योजनांची अंमलबजावणी योग्यप्रकारे होत आहे की नाही याची माहिती घेण्यात आली. तसेच ग़ृहलक्ष्मी योजनेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी ज्या महिलांनी अर्ज केले नाहीत, अशांनी नव्याने अर्ज करावेत, ज्यांचे अर्ज महिला बालकल्याण खात्याकडे केलेले आहेत. त्यांची पडताळणी करून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सूचना करण्यात आल्या. ग्रामीण भागातील जनतेला केवायसी करण्यासाठी खानापूर, नंदगड, लोंढा येथे सायबर कॅफेला जावे लागते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. यासाठी स्थानिक ग्राम पंचायतीच्या कॉम्प्युटर ऑपरेटरकडून केवायसी अपडेट करण्याच्या सूचना यावेळी ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी आर. बी. जाधव यांना करण्यात आली असून जाधव यांनी आपण ग्राम पंचायतीला आदेश देवू, असे सांगितले.
शक्ती योजना अंतर्गत महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. मात्र खानापूर तालुक्यातील कणकुंबी परिसरातील गावातील महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. यासाठी खानापूर आगार प्रमुखांनी हुबळी आणि बेळगाव आगाराशी संपर्क साधून योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना करण्यात आल्या. तसेच खानापूर जुन्या बसस्थानकापर्यंत बस येण्याच्या बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. यासाठी पूर्वीप्रमाणे जुन्या बसस्टँडपर्यंत बस सोडण्यात याव्यात, अशी सूचना बैठकीत करण्यात आली. गृहज्योती योजनेंतर्गत युनिट सरासरी काढून त्यात दहा टक्के वाढ देण्यात येणार आहे. तसेच नव्याने मीटर जोडणी करण्यात येणार आहे. त्यांना 52 युनिट मोफत देण्यात येणार आहे.