पाच राज्यातील विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका घोषित होऊ शकतात. निवडणूक आयोगाच्यावतीने तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या आठवडाभरात निवडणूक वेळापत्रक जाहीर केले जाऊ शकते. दिल्लीत शुक्रवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पाचही राज्यांमधील निवडणूक निरीक्षकांकडून संपूर्ण आढावा घेण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या राज्यांमध्ये 15 नोव्हेंबर ते 7 डिसेंबरपर्यंत मतदान होऊ शकते. या निवडणुकीच्या तारखांची घोषणा 8 ऑक्टोबरनंतर कधीही होऊ शकते.
2018 मध्ये 6 ऑक्टोबर रोजी निवडणूक तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. राजस्थान, मध्यप्रदेश, मिझोराम आणि तेलंगणामध्ये 2018 प्रमाणे एकाच टप्प्यात मतदान होऊ शकते. नक्षलप्रभावित छत्तीसगडमध्ये गेल्या वेळेप्रमाणे दोन टप्प्यात मतदान होण्याची शक्मयता आहे. मात्र, पाचही राज्यांतील मतमोजणी 10 ते 15 डिसेंबर दरम्यान एकाचवेळी होऊ शकते. या पाच राज्यांतील निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाने शुक्रवारी आपल्या निरीक्षकांची बैठक घेऊन नियोजनाबाबत अंतिम चर्चा केल्याचे समजते. बैठकीनंतर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुका (पाच राज्यांतील) हिंसाचार आणि पैशाच्या बळापासून मुक्त असतील याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोग येत्या काही दिवसांत पाच राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.









