वार्ताहर/धामणे
देसूर ता. बेळगाव येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने दुर्गामाता दौडसंदर्भात येथील धारकऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीची सुरुवात प्रेरणामंत्राने झाली. देसूर विभाग शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने दरवर्षी नवरात्र उत्सवात दुर्गामाता दौडचे आयोजन मोठ्या उत्साहाने करण्यात येते. त्याच पद्धतीने येत्या सोमवार दि. 22 रोजी घटस्थापनेपासून दुर्गामाता दौडला दररोज पहाटे 5.30 वाजता सुरुवात करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. या दुर्गामाता दौडची सुरुवात दररोज गावातील वेगवेगळ्या भागातून होणार असून विजयादशमी दिवशी दौडची सांगता होणार आहे. यंदाही नवरात्र उत्सव काळात दररोज उत्साही वातावरणात दुर्गामाता दौड काढण्याचे यावेळी ठरले. बैठकीला गावातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी ध्येयमंत्राने बैठकीची सांगता झाली.









