पुणे / प्रतिनिधी :
समृद्धी महामार्ग, पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग तसेच राज्यातील इतर विविध महामार्गांवर सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (शनिवार) पुण्यात बैठक घेणार आहेत. या बैठकीत अपघातांवरील उपाययोजनांवर ऊहोपाह होणार असून, बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पुण्यातील एनडीए (चांदणी) चौकातील नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ मंत्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यानिमित्त पुणे दौऱ्याअंतर्गत पाषाण येथे ही महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीसाठी कराव्या लागणाऱ्या संभाव्य उपाययोजनांचे सादरीकरण करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथील सिंदखेडराजाजवळ जुलै महिन्यात झालेल्या भीषण अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेचा न्यायवैद्यक अहवाल समोर आला असून, यात बरीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा अहवाल समोर ठेवूनच शनिवारच्या बैठकीत उपाययोजनांचे सादरीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती रस्ते महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
समृद्धी, द्रुतगतीवर चर्चा
समृद्धीसह पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग व इतर मार्गांवरही अपघात होत असतात. हे अपघात रोखण्यासाठी काय करता येईल, नवीन काय उपाययोजना करता येईल, यावरही बैठकीत ऊहापोह करण्यात येणार आहे.








