प्रतिनिधी,कोल्हापूर
Raju Shetti News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या इशाऱ्याची दाखल घेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार 15 रोजी तातडीची बैठक बोलावली आहे.सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी तीन वाजता बैठक होणार असल्याची माहिती स्वाभिमनी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकाद्वारे दिली.
शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त मंगळवार 13 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आले होते.यावेळी ऊस दर नियंत्रण समिती स्थापन करणे, दोन टप्प्यातील एफआरपीचा कायदा पुर्ववत करणे,प्रोत्साहन पर अनुदान तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणे,ऊस वाहतुकदारांची फसवणुक करणाऱ्या मुकादमांवर गुन्हा दाखल करणे, गारपिट, अतिवृष्टी व पिक विम्याची रक्कम तातडीने जमा करणेबाबत कार्यवाही करणे आदी प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. त्यांच्या या इशाऱ्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी गुरुवार 15 रोजी बैठक आयोजित केल्याचे दूरध्वनीवरुन कळवले आहे.
त्यामुळे स्वाभिमानीने मंगळवारी करण्यात येणारे आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित केले आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत गुरुवारी ठोस निर्णय न झाल्यास तेथून पुढे राज्यात होणाऱ्या शासन आपल्या दारी या उपक्रमात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सरकारला जाब विचारतील असा,इशाराही शेट्टी यांनी दिला आहे.