म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी बुधवार दि. 21 रोजी मुंबई येथील मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12.15 वाजता बैठक होणार असून यावेळी सीमाभागातील नागरिकांना आरोग्य योजना पुरविण्याबाबत, तसेच सीमाप्रश्नाचा खटला लवकर निकालात काढण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. सीमा समन्वय मंत्री शंभुराज देसाई यांच्या आदेशानुसार ही बैठक घेतली जाणार आहे. दोन दिवसांपूर्वी म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर समस्या मांडल्या होत्या. सीमाप्रश्नाच्या निकालाबाबत चालढकल होत असल्याने, तसेच योग्य पाठपुरावा केला जात नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. याची दखल घेऊन बुधवार दि. 21 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला बेळगावमधील मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.









