केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन : राज्य शासनाला सोबत घेऊन काम करणार!.मालवणात सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक चर्चासत्र

प्रतिनिधी /मालवण
पर्यटन सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या सर्वांगिण विकासासाठी पर्यटनातूनच समृद्धीचे अनेक मार्ग शोधणे आवश्यक आहे. परमेश्वराने सिंधुदुर्गला पर्यटनाची दिलेली अनमोल देणगी आहे. यातूनच येथील हजारो हातांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. पर्यटन विकासासाठी येत असलेल्या अनेक समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाला सोबत घेऊन लवकरच मुंबईत बैठक आयोजित करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मालवण येथे केले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रीकल्चरच्या कोकण रिजन आणि पर्यटन समिती, पर्यटन व्यावसायिक महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्री नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यटन व्यावसायिकांच्या समस्यांवर येथील हॉटेल चिवला बीच येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. व्यासपिठावर पर्यटन समिती चेअरमन संतोष तावडे, पर्यटन महासंघ अध्यक्ष बाबा मोंडकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, अशोक सावंत, धोंडी चिंदरकर, लखमराजे भोसले, टीटीडीएस अध्यक्ष सदानंद साळगावकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले. दरम्यान, बाबा मोंडकर यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड ऍग्रीकल्चरच्या पर्यटन समिती कोकण विभाग प्रमुखपदी तसेच मेघा गावकर यांची महिला उद्योजकता समिती संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
सर्वांनीच मांडल्या समस्या
पर्यटन व्यावसायिकांनी वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, सीआरझेडचे निर्बंध, सुरक्षित पर्यटन होण्यासाठी येत असलेल्या अडचणी, शासन परवानगी मिळण्यासाठी होत असलेला विलंब, नियमांवर बोट ठेवून दिला जात असलेला त्रास, कर्ज प्रकरणांसाठी बँकांकडून होत असलेले असहकार्य, कांदळवनाखाली गेलेल्या जमिनींचा मोबदला मिळणे आदी समस्या मांडल्या. अवि सामंत यांनी सिंधुदुर्गचा पर्यटन ब्रॅण्ड निर्माण करून त्याद्वारे जगभरात प्रचार, प्रसिद्धी करावी, अशी सूचना मांडली. रामा चोपडेकर यांनी सुरक्षित व शाश्वत पर्यटनासाठी पर्यटन संस्थांना शासनाने अधिकार द्यावेत, अशी मागणी केली. बाबा मोंडकर यांनी मोरयाचा धोंडा येथे पर्यटन विकास, केंद्र शासनाकडून सिंधुदुर्ग जिल्हा दत्तक घेण्यात आल्याने त्यानुसार पर्यटन विकास आराखडा तयार करणे, सीवर्ल्ड प्रकल्प पूर्ण करून बारमाही पर्यटन संकल्पना अस्तित्वात आणणे याविषयांवर लक्ष वेधले.
तारकर्ली पर्यटन संस्थेचे कौतुक
तारकर्ली पर्यटन संस्थेने एकत्रित येत निर्माण केलेले काम कौतुकास्पद आहे. अशा संस्था निर्माण होऊन त्यांनी पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या त्या-त्या ठिकाणी सोडविण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. संस्था रजिस्टेशन करा अगर राज्य शासनाच्या निर्देशानुसार कार्यवाही करा पण असे काम केल्यास नवनवीन उपक्रम राबविता येणे शक्य आहे. पर्यटन व्यावसायिकांनी एकही रुपयाचे अनुदान न मिळता जिल्हय़ात उभे केलेले काम हे आनंददायी आहे. आतापर्यंत माझ्यासमोर मांडण्यात आलेल्या समस्या सोडविण्यासाठी मी बांधील आहे. पर्यटन मंत्रालय सर्व व्यावसायिकांच्या पाठिशी राहून काम करणार आहे, असेही नाईक म्हणाले.
पर्यटन क्षेत्रात रोजगाराची संधी!
पर्यटन क्षेत्रामध्येच प्रचंड रोजगार निर्माण करण्याची संधी आहे. केंद्र शासनाच्या अनेक योजनांतून राज्य शासनाला पर्यटन विकासासाठी आम्ही निधी उपलब्ध करून दिलेला आहे. यापुढेही तो देत राहू. काही समस्या या राज्य शासनाच्या अखत्यारीत असल्याने त्यांचेही सहकार्य घेण्यात येईल. पर्यटन मंत्री, सचिव आणि केंद्रीय सचिव यांची एकत्र बैठक लवकरच होईल. सिंधुदुर्गातील समस्या जाणून घेण्यात आल्या असून याबाबत मुंबईतील बैठकीत सकारात्मक निर्णय होऊन पर्यटन उद्योग नव्याने उभारी घेईल, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.









