जिल्हाधिकाऱ्यांसह महानगरपालिका आयुक्तांची उपस्थिती : नागरिकांमध्येही उत्सुकता
बेळगाव : कॅन्टोन्मेंट हस्तांतरणाबाबत सोमवार दि. 12 रोजी बेंगळूर येथे महत्त्वाची बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीला बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, कॅन्टोन्मेंटचे सीईओ राजीवकुमार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत कॅन्टोन्मेंट हद्दीतील बंगलो एरियाच्या हस्तांतरणाबाबत काय चर्चा होणार आहे, हे पहावे लागणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डने 1763 एकर जमिनीपैकी नागरी वसाहतीची 112 एकर जमीन हस्तांतरित करण्याला संमती दिली. परंतु, उर्वरित बंगलो एरिया मात्र कॅन्टोन्मेंटकडेच राहील, असे स्पष्ट केल्याने नागरिकांनी विरोध केला. त्यानंतर लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतल्याने जिल्हा प्रशासनाने महानगरपालिकेकडून सर्वेक्षण होणार असल्याचे जाहीर केले. परंतु, कॅन्टोन्मेंटकडून बंगलो एरियाचे नकाशे दिले जात असल्याने सर्वेक्षणाचे काम रखडल्याची तक्रार महापालिका कर्मचाऱ्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर सोमवार दि. 12 रोजी बेंगळूर येथे बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीला राज्य सरकारचे प्रतिनिधीदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे बैठकीत हस्तांतरणाबाबत कोणता निर्णय घेण्यात येतो, याबाबत नागरिकांमध्येही उत्सुकता आहे. या बैठकीला कॅन्टोन्मेंट तसेच महापालिकेचे इतर अधिकारीही उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
बुधवार दि. 14 रोजी पुन्हा बैठक
बेंगळूर येथील बैठक पार पडल्यानंतर बुधवार दि. 14 रोजी पुन्हा बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी तसेच कॅन्टोन्मेंट सीईओंच्या उपस्थितीत ही बैठक घेतली जाणार आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या हस्तांतरणाबाबत आता अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत.









