ब्रिगेडियर, सीईओ बैठकीला उपस्थित राहणार
बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे महानगरपालिकेमध्ये हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. राज्यात एकमेव असणाऱ्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हस्तांतरणासाठी संरक्षण मंत्रालयाने गुरुवार दि. 22 रोजी दिल्ली येथे बैठक बोलाविली आहे. या बैठकीला कॅन्टोन्मेंट बोर्डचे अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी व सीईओ राजीव कुमार उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. बेळगावसह देशभरातील सर्वच कॅन्टोन्मेंट बोर्डचे स्थानिक महानगरपालिकांमध्ये हस्तांतरण करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड चालविणे संरक्षण मंत्रालयाला जिकिरीचे होत असल्याने हस्तांतरणाचा प्रस्ताव मागील काही वर्षांपासून सुरू आहे. परंतु, अनेक तांत्रिक अडचणींमुळे हा प्रस्ताव बारगळला होता. परंतु, मागील काही दिवसांत हस्तांतरणाच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला संरक्षण मंत्रालयाने कर्नाटक सरकारच्या सचिवांना पत्र पाठवून बोर्डच्या सीमा निश्चित करण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच हस्तांतरणाच्या प्रक्रियेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीमध्ये राज्यातील वरिष्ठ अधिकारी, पुणे येथील सदर्न कमांडचे संचालक, कॅन्टोन्मेंट बोर्डचे अध्यक्ष व सीईओ यांचा समावेश करण्यात आला. या कमिटीला महिनाभराचा कालावधी देण्यात आला होता. कॅन्टोन्मेंट बोर्डमधील लोकसंख्या, मालमत्ता, खुल्या जागा, मिळणारा महसूल, कॅन्टोन्मेंट बोर्डचे कर्मचारी, पेन्शनर्स, सिव्हिल सर्व्हिस स्टोअर्स, रस्ते व्यवस्थापन यांसह इतर बाबतीत दिल्ली येथे अहवाल दिला जाणार आहे. या बैठकीला ब्रिगेडियर व सीईओ उपस्थित राहणार असल्याने हस्तांतरणाची प्रक्रिया लवकरच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.









