महापालिकेच्या अर्थसंकल्पीय पूर्वतयारी बैठकीतील प्रकार : उपस्थित पदाधिकाऱ्यांतून नाराजी, सत्ताधारी गटनेत्याकडून दिलगिरी व्यक्त
बेळगाव : महापालिकेची गुरुवार दि. 16 रोजीची अर्थसंकल्पीय पूर्वतयारी बैठक नियोजित वेळेपेक्षा तब्बल एक तास उशिरा सुरू झाल्याने उपस्थित माजी महापौर-उपमहापौर, नगरसेवक व विविध संघ-संस्थांच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वेळेचे गांभीर्य नसेल तर यापुढे आम्हाला बोलावू नये, असे खडेबोल सुनावले. त्यानंतर विरोधी गटनेते मुजम्मील डोणी यांनीही नाराजी व्यक्त केली. बैठक पार पडल्यानंतर सत्ताधारी गटनेते गिरीश धोंगडी यांनी सत्ताधारी पक्ष या नात्याने बैठक सुरू होण्यास विलंब झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली व बैठक विलंबाने सुरू होण्यास कारणीभूत अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी महापौरांकडे केली.
महापालिकेचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तत्पूर्वी शहरातील माजी महापौर, उपमहापौर, उद्योजक, चेंबर ऑफ कॉमर्स, बांधकाम व्यावसायिक आदी संघ-संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी महापालिकेकडून गुरुवारी अर्थसंकल्पीय पूर्वतयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका सभागृहात सकाळी 11 वाजता बैठकीला सुरुवात होणार होती. त्यामुळे विविध संघ-संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी महापौर, उपमहापौर नियोजित वेळेत सभागृहात उपस्थित होते. पण महापौर आणि उपमहापौर त्याचबरोबर मनपा आयुक्तही सभागृहात 12 वाजले तरी हजर झाले नाहीत. त्यामुळे उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
12 वाजून 10 मिनिटांनी महापौर-उपमहापौर दाखल झाले. मनपा उपायुक्त (प्रशासन) उदयकुमार तळवार यांनी सवर्चें स्वागत करत बैठकीला सुरुवात केली. पण मनपा आयुक्त येईपयर्तिं सभा सुरू करण्यात येऊ नये, अशी मागणी उपस्थितांनी केली. जिल्हाधिकारी रजेवर असल्याने मनपा आयुक्तांवर काही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ती पार पाडण्यासाठी आयुक्त गेल्या आहेत. काही मिनिटांतच त्या सभागृहात हजर होतील, असे सांगितल्यानंतर बैठकीला सुरुवात झाली. यापूर्वी सत्ताधारी गटातील चार नगरसेवक आणि विरोधी गटातील चार नगरसेवक एकत्र बसून अर्थसंकल्प पूर्वतयारी बैठक कधी घ्यावी, याबाबत चर्चा करून निर्णय घेत होते. मात्र, आता मनमानी पद्धतीने बैठक ठरविली जात आहे. बैठकीच्या चार दिवस आधी कळविणे जरुरीचे आहे. पण बुधवारी सायंकाळी 6 वा. बैठक असल्याचे कळविण्यात आले. त्यातच 11 वाजताची बैठक 12 वाजता सुरू केली जात आहे, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे अर्थसंकल्पीय बैठक पार पडल्यानंतर सत्ताधारी गटाचे गटनेते गिरीश धोंगडी यांनी बैठकीला उशीर झाल्याबद्दल प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सत्ताधारी गटाला जबाबदार धरण्यात आले, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. बैठकीला महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण यांच्यासह नगरसेवक, सरकार नियुक्त नगरसेवक, अधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.









