बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पत्रव्यवहार : आरोग्य विभागाकडून पुढाकार
बेळगाव : सफाई कामगारांच्या घरांच्या हक्कपत्रासंदर्भात बैठक घेऊन चर्चा करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली असल्याने महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी शुक्रवार दि. 7 रोजी महापालिकेत सफाई कामगारांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून संबंधित सफाई कामगारांना बैठकीला उपस्थित राहण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यासह सफाई निरीक्षकांच्याकरवी कळविले जात आहे.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात गेल्या अनेक वर्षांपासून सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या काही कामगारांना घरांचे वितरण करण्यात आले आहे. मात्र अद्यापही काहीजण घरापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने घरांचे हक्कपत्राचे वितरण करण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या काही वर्षांपासून सफाई कामगार हितरक्षण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गत आठवड्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन सफाई कामगारांच्या घरासंदर्भात कार्यवाही करण्याची सूचना केली होती.
सफाई कामगारांना क्वॉर्टर्स, भूखंड, की घर हवे याबाबत त्यांची मते आजमावून घेण्यासंदर्भात बैठक घेण्याची सूचना मनपा आयुक्तांना जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. तसेच दोन दिवसांपूर्वी महापालिकेत सफाई कामगार आयोगाच्या अधिकाऱ्यांनीदेखील बैठक घेऊन विविध सूचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सफाई कामगारांना घरांचे वितरण व हक्कपत्रासंदर्भात बैठक घेण्याचा निर्णय महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी घेतला आहे. शुक्रवार दि. 7 रोजी दुपारी 3 वा. महापालिका सभागृहात ही बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाकडून सफाई कामगारांना बैठकीला हजर राहण्यासाठी पत्रव्यवहाराबरोबरच स्वच्छता निरीक्षकांच्याकरवी कळविले जात आहे.









