कामगार खात्याकडे निवेदनाद्वारे मागणी : शासनाच्या सुविधा मिळत नसल्याने कामगार अडचणीत
बेळगाव : बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी मजगाव येथील कामगार खात्याला निवेदन देण्यात आले आहे. कामगारांना घर उपलब्ध करून द्या, कामगारांच्या मुलांना लॅपटॉप वितरीत करा, विद्यार्थ्यांना वाढीव शिष्यवृत्ती द्या, कामगारांना नवीन कामगार कार्डे द्या, आदी मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले आहे. बांधकाम कामगारांना शासनाच्या सुविधा मिळत नसल्याने कामगार अडचणीत येऊ लागले आहेत. बांधकाम कामगारांना मागील दोन वर्षांपासून घरकुलासाठी अनुदान देण्यात आले नाही. त्याबरोबर कामगारांच्या मुलांना लॅपटॉप वितरीत झाले नाहीत. त्यामुळे शिक्षणात अडचणी येऊ लागल्या आहेत. त्याबरोबर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत कपात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
बांधकाम कामगारांना मोफत बसपास द्या
शासनाने बांधकाम कामगारांना बसपासची सुविधा उपलब्ध केली होती. मात्र तीही काही दिवसात बंद झाली आहे. त्यामुळे कामगारांना प्रवासादरम्यान आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांना मोफत बसपास उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
लग्नासाठी अनुदान द्या
बांधकाम कामगार संघटनेतर्फे जानेवारी महिन्यात कामगारांच्या मुलांच्या लग्नासाठी अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. यानुसार 103 कामगारांच्या मुलांच्या लग्नासाठी अनुदान मंजूर झाले आहे.









