उद्धव ठाकरेंनी घेतली राज ठाकरेंची भेट : दसरा मेळाव्यात युतीचे संकेत
प्रतिनिधी/ मुंबई
एकेकाळी हेटाळणीचा विषय झालेले राज ठाकरे आता उद्धव ठाकरेंची राजकीय गरज झाली आहे. त्यामुळेच डिसेंबर-जानेवारीत मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात घेऊन उद्धव सेनेने त्यांच्याबरोबर राजकीय युतीची घोषणा करण्याचे निश्चित केले असण्याची शक्यता आहे. दसरा मेळाव्यात महत्त्वाची घोषणा करण्याची शिवसेनेची परंपरा आहे. त्यामुळे मनसेबरोबर युतीच्या घोषणेचा दसरा मेळावा उत्तम मुहूर्त ठरेल या ध्येयाने बुधवारी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या दोन सहकारी नेत्यांबरोबर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली असावी, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येताना दिसत आहेत. त्यामुळे राज ठाकरे हे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र त्या आधीच उद्धव ठाकरे आज पुन्हा शिवतीर्थवर नेत्यांसह राज ठाकरे यांची भेट घेतली.
हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र हे दोन्ही जीआर रद्द झाल्यानंतर विजयी मेळाव्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर एकत्र आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनंतर मातोश्रीवर गेले होते. या भेटीनंतर राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब गेले होते. त्यामुळे आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र त्या आधीच उद्धव ठाकरे बुधवारी पुन्हा शिवतीर्थवर आपल्या नेत्यांसह राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहचले आहेत.
काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येताना दिसत आहेत. हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह विरोधकांनी जोरदार विरोध केला होता. त्यामुळे राज्य सरकारला यासंदर्भातील दोन्ही जीआर रद्द करावे लागले होते. यानंतर 5 जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर एकत्र आले होते. त्यानंतर 27 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी दोन्ही ठाकरे बंधूंचे कुटुंब एकत्र आले होते.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच बुधवारी खासदार संजय राऊत आणि आमदार अनिल परब यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्या वक्तव्यानुसार उद्धव ठाकरे एकत्र राहण्याचा प्रयत्न करत
आहेत. या भेटीत सुमारे दोन अडीच तास चर्चा झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये यावेळी पालिका निवडणुकींच्या वाटाघाटींची पहिली बैठक पार पडली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दसरा मेळाव्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
संमिश्र प्रतिक्रिया
या भेटीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. महाविकास आघाडीत मनसेबाबत हायकमांडसोबतच्या चर्चेनंतर निर्णय होईल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. दुसरीकडे समविचारी पक्षांसोबत जाण्यासाठी नेहमीच तयार आहोत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. अधिकृतरित्या आमच्यामध्ये बैठका सुरू आहेत, असे मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.
दरम्यान ठाकरे आणि मनसे यांची युती झाली तर महायुतीला फारसा फरक पडणार नसल्याची प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास काही होणार नाही, असे भाजप नेते मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.









