पुणे / प्रतिनिधी :
कारकिर्दीत सर्वोच्च स्थानावर असताना मी चित्रपटसृष्टीतून बाहेर पडले आणि अमेरिकेला गेले. त्यानंतर कामात अनेक वर्षांचा खंड पडला. पण आता मी भारतात परतले असून अभिनय आणि नृत्य क्षेत्रात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. माझ्याकडे सध्या काही ऑफर असून, लवकरच एखाद्या चित्रपटातून किंवा वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची माहिती अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी दिली.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ‘सांस्कृतिक कट्टा’ या उपक्रमांतर्गत शेषाद्री यांनी संवाद साधला. या वेळी संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी उपस्थित होते.
शेषाद्री म्हणाल्या, चित्रपटसृष्टीतून बाहेर पडण्याच्या निर्णयाची खंत वाटत नाही. मी विवाहानंतर अमेरिकेला स्थायिक झाले. कुटुंबाला वेळ दिला. तेथे मुलांना नृत्यही शिकवले. मात्र आता परतले असून पुण्यात स्थायिक झाले आहे. पुनरागमनासाठी खूप वेळ घेतला, असे वाटत नाही. पुनरागमनासाठी ही योग्य वेळ असल्याने पुनरागमन करते आहे.
…तर नक्कीच मराठीत काम करेन!
मराठीमध्ये काम करण्यास मी उत्सुक आहे. मराठीतील अनेक अभिनेत्री दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करतातच. त्यात भाषेचा अडथळा येत नाही. मला तर मराठी बरीच समजते. त्यामुळे चांगला चित्रपट आणि उत्तम दिग्दर्शक असेल, तर नक्कीच मराठीत काम करेन, असेही त्यांनी नमूद केले.
‘दामिनी’सारखा चित्रपट पुन्हा नाही!
मीनाक्षी शेषाद्री यांची प्रमुख भूमिका असलेला ‘दामिनी’ हा चित्रपट खूप गाजला होता. प्रेक्षकांसह समीक्षकांनी पण त्याचे खूप कौतुक केले होते. या चित्रपटानंतर असे परखड भाष्य करणारे अनेक चित्रपट येतील असे वाटले होते. मात्र तसा चित्रपट पुन्हा आला नाही आणि अभिनेत्रींनाही तसे काम करायला मिळाले नाही, अशी खंत शेषाद्री यांनी या वेळी व्यक्त केली.