वृत्तसंस्था/ पिथौरागड
कैलास मानसरोवर यात्रेच्या दुसऱ्या तुकडीत सामील दिल्लीच्या रहिवासी आणि माजी केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी या तिबेटच्या दारिचन येथे घोड्यावरून पडून जखमी झाल्या आहेत. कंबरेला जखम झाल्याने त्यांना यात्रा अर्ध्यावरच सोडून भारतात परतावे लागणार आहे.
दुर्घटनेनंतर त्वरित त्यांना यात्रा मार्गावरील तात्पुरत्या रुग्णालयान नेण्यात आले, जेथे एक्स-रे करविण्यात आला असता दुखापतीचे स्वरुप स्पष्ट झाले. त्यांची स्थिती पाहता त्यांना तत्काळ भारतात परत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरता पिथौरागड जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयार केली आहे. लेखी यांना वाहनाद्वारे तिबेटच्या लिपुलेख खिंडीपर्यंत आणले जाणार आहे. येथून स्ट्रेचर किंवा अन्य साधनांद्वारे नाभीढांगपर्यंत पायी आणले जाईल.
नाभीढांग येथून हेलिकॉप्टरने त्यांना देहरादून येथे आणले जाणार आहे. तकलाकोट येथून दारचिनचे अंतर 102 किलोमीटर आहे. तिबेटमध्ये तकलाकोट नंतर दारचिन हाच यात्रेचा दुसरा टप्पा आहे. परंतु अतिवृष्टी आणि खराब हवामान या बचावमोहिमेत मोठा अडथळा ठरू शकते. पिथौरागडच्या उच्च हिमालयीन क्षेत्रांमध्ये पावसामुळे स्थिती प्रतिकूल ठरली आहे. हवामानाची साथ न लाभल्यास हेलिकॉप्टर नाभीढांगपर्यंत पोहोचणे अवघड ठरू शकते. जिल्हा प्रशासन आणि कुमाऊं मंडल विकास निगम हवामानावर नजर ठेवून आहे.









