वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2023 च्या टेनिस हंगामाअखेरीस म्हणजेच 24 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विश्व टेनिस लिग स्पर्धेत रशियाचा अव्वल टेनिसपटू डॅनिल मेदव्हेदेव पीबीजी ईगल्स या भारतीय संघाकडून खेळणार असल्याचे सांगण्यात आले. या संघामध्ये रशियाच्या आंद्रे रुबलेवचाही समावेश आहे.
ही स्पर्धा 21 ते 24 डिसेंबर दरम्यान अबुधाबीमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातील अव्वल 16 टेनिसपटू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये पुनित बालन समूह पुरस्कृत भारतीय संघ भाग घेईल. मेदव्हेदेवने 2021 साली अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती तर 2023 साली त्याने विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. विश्व टेनिस लिग स्पर्धेत अबुधाबीत खेळण्याची संधी आपल्याला मिळाल्याबद्दल मेदव्हेदेवने समाधान व्यक्त केले आहे. पुनित बालन उद्योग समुहाने विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या मालकीचे 9 संघ उतरवले आहेत. यावेळी विश्व टेनिस लिग स्पर्धेचे जेतेपद मिळवणे हेच आमचे प्रमुख ध्येय असल्याचे पाबीजी इगल्सचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक पुनित बालन यांनी सांगितले.
विश्व टेनिस लिग स्पर्धेच्या स्वरुपाची माहिती देताना आयोजकांनी सांगितले की सदर स्पर्धेमध्ये चार संघांचा समावेश राहिल. प्रत्येकी संघामध्ये चार टेनिसपटू राहतील. पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरीचे सामने होतील. 24 डिसेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. महिलांच्या विभागात टॉपसिडेड साबालेंका, ग्रीकचा सित्सिपस तसेच चारवेळा ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवणारी पोलंडची इगा स्वायटेक या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण आहेत.









