वृत्तसंस्था / नवी दिल्ली
एटीपी टूरवरील सुरू असलेल्या हेर्टोगेनबॉश खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या तृतीय मानांकित डॅनियल मेदव्हेदेवला फ्रान्सच्या मॅनेरिनोकडून पराभव पत्करावा लागला.
या स्पर्धेतील झालेल्या पुरुष एकेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या अॅड्रियन मॅनेरिनोने मेदव्हेदेवचा 6-4, 2-6, 6-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. गेल्या महिन्यात झालेल्या फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत मेदव्हेदेवला पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली होती. 2023 च्या टेनिस हंगामात मेदव्हेदेवने आतापर्यंत 5 स्पर्धा जिंकल्या आहेत. पुढील आठवड्यात जर्मनीतील हॅले येथे होणाऱ्या ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत मेदव्हेदेव सहभागी होणार आहे. जुलै महिन्यात विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा होत असल्याने मेदव्हेदेवने सरावासाठी हॅलेतील स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे.









