वृत्तसंस्था/ टय़ुरिन (इटली)
2022 च्या टेनिस हंगामाअखेरीस येथे सुरू असलेल्या एटीपी फायनल्स पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत सर्बियाचा माजी टॉप सीडेड जोकोविचने रशियाच्या माजी टॉप सीडेड डॅनिल मेदवेदेव्हचा तीन सेट्समधील लढतीत पराभव करत आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. या स्पर्धेत रशियाच्या रुब्लेव्हने ग्रीकच्या सित्सिपेसचा पराभव करत उपांत्यफेरीतील आपले स्थान निश्चित केले. रुब्लेव्ह आणि नॉर्वेचा रुड यांच्यात उपांत्यफेरीची लढत होणार आहे.
जोकोविचने मेदवेदेव्हचा 6-3, 6-7 (5-7), 7-6 (7-2) असा पराभव केला. रेड गटातून जोकोविचने आघाडीचे स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत जोकोविच अद्याप पराभूत झालेला नाही. जोकोविचने एटीपीची ही फायनल स्पर्धा आतापर्यंत पाचवेळा जिंकली आहे. जोकोविच आणि अमेरिकेचा टेलर फ्रिज यांच्यात उपांत्यफेरीची लढत होणार आहे.
रशियाच्या आंदे रुब्लेव्हने ग्रीकच्या स्टीफॅनोस सित्सिपेसचा 3-6, 6-3, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव करत उपांत्यफेरी गाठली आहे. नॉर्वेचा ख्रिस रुड आणि रुब्लेव्ह यांच्यात उपांत्यफेरीची लढत होणार आहे. या सामन्यात रुब्लेव्हने आपल्या वेगवान जमिनीलगतच्या फटक्मयावर अधिक भर देत सित्सिपेसला पराभूत केले. हा सामना 1 तास 42 मिनिटे चालला होता.









