वृत्तसंस्था /इंडियन वेल्स (कॅलिफोर्निया)
बीएनपी पेरीबस खुल्या इंडियन वेल्स पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुरुष विभागात रशियाचा चौथा मानांकित मेदव्हेदेवने बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हचा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले तर महिलांच्या विभागात एम्मा नेव्हारोने द्वितीय मानांकित साबालेंकाचा पराभव केला. तसेच अमेरिकेच्या कोको गॉफने शानदार विजयाने आपला 20 वा वाढदिवस साजरा केला. पुरुषांच्या विभागात चौथ्या मानांकित मेदव्हेदेवने बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हचा 6-4, 6-4, नॉर्वेच्या नवव्या मानांकित कास्पर रुडने फ्रान्सच्या मोनफिल्सचा 3-6, 7-6 (7-3), 6-4 तसेच अमेरिकेच्या टॉमी पॉलने इटलीच्या नेर्डीचा 6-4, 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. या स्पर्धेत नेर्डीने सर्बियाच्या टॉप सिडेड जोकोविचला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का दिला होता. महिलांच्या विभागातील चौथ्या फेरीच्या सामन्यात एम्मा नेव्हारोने द्वितीय मानांकित साबालेंकाचा 6-3, 3-6, 6-2 असा फडशा पाडत पुढील फेरीत स्थान मिळवले. अमेरिकेच्या 22 वर्षीय नेव्हारोने या वर्षीच्या प्रारंभी होबार्ट टेनिस स्पर्धा जिंकली होती. अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफने इलेसी मर्टन्सचा 6-0, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये तासभराच्या कालावधीत पराभव करत आपला 20 वा वाढदिवस साजरा केला.









