प्रतिनिधी/ बेळगाव
डॉक्टरांचा सल्ला न घेता अनावश्यक औषध घेणे हे किडणीला मारक ठरू शकते किंवा पुढील दिवसांत किडणीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कोणतीही औषधे घ्यावीत, असा सल्ला नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. मल्लिकार्जुन करीशेट्टी (खानपेट) यांनी दिला. केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय-वैद्यकीय संशोधन केंद्राच्या नेफ्रॉलॉजी विभागातर्फे जागतिक मूत्रपिंड दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. करीशेट्टी बोलत होते. मूत्रपिंड निकामी झाल्यास डायलिसिस किंवा मूत्रपिंड रोपण हा एकमेव उपाय आहे. रक्तदाब, मधुमेह, मुतखडा, मूत्रनलिकेत दाह यासारखे विकार आरोग्याला मारक ठरू शकतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. वैद्यकीय सुविधा, अवयव दानाचे कार्य, अवयव प्रत्यारोपण, यासारख्या उपक्रमासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे, असे डॉ. करीशेट्टी म्हणाले.
प्रत्यारोपणाची सुविधा कोरे रुग्णालयात
रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. कर्नल एम. दयानंद म्हणाले की, कोणतेही अवयव प्रत्यारोपण करण्याची सुविधा उत्तर कर्नाटकातील केएलई संस्थेच्या बेळगाव येथील डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयात असून, येथील वैद्यकीय सुविधेचा रुग्णांनी वेळीच लाभ घेतला पाहिजे. रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात डॉ. कोरे रुग्णालय नेहमीच एक पाऊल पुढे असते. मूत्रपिंड प्रत्यरोपणासंबंधी अधिकाधिक जागृती होणे गरजेचे आहे. नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. रितेश वेर्णेकर, डॉ. रवी सारवी यांसह अन्य डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
पोलिसांची आरोग्य तपासणी
सशस्त्र पोलीस दलातील पोलिसांची यावेळी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. 100 हून अधिक पोलिसांचे रक्त व मूत्रपिंड तपासणी करून डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य के. एम. महादेवप्रसाद, उपप्राचार्य आशिष मेघण्णावर, उपनिरीक्षक दयानंद रडेरट्टी आदी यावेळी उपस्थित होते.









