अंतराळात, निर्वात परिस्थितीत औषध निर्मिती करण्याचा प्रयोग सध्या केला जात आहे. अमेरिकेच्या एका औषध कंपनीने याकामी पुढाकार घेतला आहे. या कंपनीने अतंरिक्षात एक कुपी पाठविली असून त्या कुपीत एका महत्वाच्या औषधाचा स्फटिक निर्माण करण्यात कंपनीला यश आल्याचे वृत्त आहे.
अंतराळात, जेथे गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव अतिशय कमी असतो, तेथे स्फटिकीकरणाची प्रक्रिया वेगाने, सुलभरित्या आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने होऊ शकते, हे या प्रयोगामधून अनुभवास आले आहे. अशा प्रकारची औषधे पृथ्वीवर निर्माण केलेल्या औषधांपेक्षा अधिक परिणामकारक आणि अतिशय शुद्ध स्वरुपातली असतात असे संशोधकांचे मत आहे. जे औषध आता अंतराळात निर्माण करण्यात आले आहे, ते एचआयव्ही आणि हेपिटायटीस यांसारख्या दुर्धर रोगांवर उपयोगात आणता येणार आहे. सध्या या औषधाची विविध परीक्षणे केली जात आहेत.
हा प्रयोग करणारी कंपनी ही स्टार्टअप कंपनी असून तिचे नाव वर्डा अवकाश कंपनी असे आहे. या कंपनीच्या संचालकांनी या अनोख्या प्रयोगाची माहिती नुकतीच प्रसिद्ध केली आहे. या कंपनीने अंतराळात पाठविलेली कुपी आणि तिच्यात औषध निर्मिती होत असतानाची सर्व प्रक्रिया आणि या कुपीतून पृथ्वीवर पाठविण्यात आलेली महिती आणि विदा (डाटा) यांचे सविस्तर विश्लेषण करण्याच कार्य सध्या केले जात आहे. अर्थातच, ही अंतराळनिर्मित औषधे बाजारात उपलब्ध होण्यास बराच विलंब लागणार आहे. पण औषधनिर्मितीचे एक नवे दालन या प्रयोगामुळे उघडले गेले आहे, असे मत अनेक वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे.









