डॉ. रवी पाटील हेल्थ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आवाहन
बेळगाव : वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना जर्मनीमधील प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये काम करण्याची उत्तम संधी उपलब्ध आहे. त्यांच्या जॉब व करिअर सिक्युरिटी तसेच सोशल सिक्युरिटीची जबाबदारी आमची आहे. त्यांना भरघोस वेतनही दिले जाईल, तेव्हा डॉ. रवी पाटील हेल्थ इन्स्टिट्यूटतर्फे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा आवर्जुन लाभ घ्यावा, असे आवाहन जर्मनीतील विविध हॉस्पिटल आणि कंपन्यांच्या सीईओंनी केले. होनगा येथे नव्यानेच कार्यरत झालेल्या डॉ. रवी पाटील हेल्थ इन्स्टिट्यूटतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आवाहन केले. याप्रसंगी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. रवी पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. जर्मनीतील हॉस्पिटलसमवेत डॉ. रवी पाटील हेल्थ इन्स्टिट्यूटने समन्वय करार केला आहे. त्यामुळे फार्मसी, बी फार्म, नर्सिंग, फिजिओथेरपी व हेल्थ सायन्सचा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीची उत्तम संधी मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.
जर्मनी येथील एडब्ल्यूओ ओबर अँड मिलेट फ्रँकेनचे वुलरिच थेरेसियाविस, एडब्ल्यूओ केव्हीनर्नबर्गचे इशा नोयेनवेटर, मेडियाटोसचे लुकास फर्निनांड, अँडरिक रोलँड कार्लटन जॉन, राहेल शॉन, मॅक्सीमिलियन जॉन हे पात्र विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांची निवड करतील, असे त्यांनी सांगितले. जर्मनीमध्ये कामगार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. तेथील हॉस्पिटलमध्ये नोकरी करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय विमा मिळू शकतो. महिलांना प्रसूती रजा मिळू शकते. तसेच विद्यार्थ्यांना भारतात जाण्यासाठी एक महिना पगारी सुटी दिली जाते. तसेच स्टाफच्या मुलांना मोफत शिक्षण मिळते. भारतीय आहार आणि निवासी सोयही केली जाते, अशी माहिती राहेल शॉन यांनी दिली.
डॉ. रवी पाटील हेल्थ इन्स्टिट्यूटमध्ये तिसरे वर्ष संपताच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कौशल्य प्रशिक्षणाची संधी दिली जाते. बी फार्म, नर्सिंग, फिजिओथेरपी व आयुर्वेद यांचे शिक्षण येथे दिले जाते. जर्मनीतील उपलब्ध संधी लक्षात घेता याच ठिकाणी विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे शिक्षणही दिले जाते. त्यामुळे जेव्हा येथील विद्यार्थी जर्मनीमध्ये नोकरीसाठी जातो त्यावेळी त्याला भाषेची अडचण जाणवत नाही. शिवाय येथे प्रशिक्षण घेतल्यामुळे तो आत्मविश्वासाने तेथे काम करू शकतो व जगातील कोणत्याही रुग्णाला हाताळू शकतो, असे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी अकॅडमिक डीन डॉ. डेव्हिड कोला, सीईओ डॉ. सोमशेखर पुजार, नर्सिंग विभागाचे संचालक अतुल कापडी व समन्वयक डॉ. रश्मी उपस्थित होते. यानंतर जर्मन प्रतिनिधींनी जर्मनीतील विविध सुविधांबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या.









