पाकिस्तानच्या नेत्याने केले महत्वपूर्ण स्पष्टीकरण
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
‘सिंदूर’ अभियानासंदर्भात आणि पाकिस्तानशी झालेल्या शस्त्रसंधी संदर्भात भारताने अमेरिकेची मध्यस्थी स्वीकारण्याचा प्रस्ताव भारताने स्पष्टपणे अमान्य केला होता, असा गौप्यस्फोट पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री इशाक दर यांनी केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या संघर्षात आपण मध्यस्थी केल्याने दोन्ही देशांमधील अणुयुद्ध टळले होते, असे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी वारंवार केले आहे. त्यांच्या या प्रतिपादनाला छेद देणारे विधान दर यांनी केले आहे. त्यांनीच अशी कबुली दिल्याने भारताची बाजू खरी ठरली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोठा सशस्त्र संघर्ष झाला होता. या संघर्षात भारताने पाकिस्तानची अतोनात हानी केली होती. हा संघर्ष शिगेला पोहचला असताना अमेरिकेने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिकेने शस्त्रसंधी प्रस्ताव ठेवला होता. तथापि, भारताने अमेरिकेची मध्यस्थी आणि हा शस्त्रसंधी प्रस्ताव अमान्य केला होता, अशी स्पष्टोक्ती दर यांनी पाकिस्तानतील एका कार्यक्रमात मंगळवारी जाहीररित्या केली आहे.
भारताची भूमिका खरी
शस्त्रसंधीसाठी प्रथम पाकिस्तानने प्रस्ताव पाठविला होता. तो भारताकडून मान्य करण्यात आला होता, असे भारताने वारंवार स्पष्ट केले आहे. या प्रकरणात कोणत्याही तिसऱ्या देशाची मध्यस्थी आम्ही स्वीकारलेली नाही. कारण भारताची ही दीर्घकालीन भूमिका आहे. त्यामुळे अमेरिकेची मध्यस्थी स्वीकारण्याचा प्रश्न उद्भवला नाही, ही वस्तुस्थिती भारताने अनेकदा जाहीरपणे मांडली आहे.
पाकिस्तानकडून अमेरिकेची कोंडी
दर यांच्या या विधानामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या विधानाला परस्पर छेद गेला आहे. पाकिस्तानने सत्य स्पष्ट करुन अमोरिकेची कोंडी केली, असा याचा अर्थ काढला जात आहे. ट्रंप यांनी वारंवार केलेल्या मध्यस्थीच्या प्रतिपादनावरही यामुळे प्रश्नचिन्ह लागले आहे. पाकिस्तानी नेत्याच्या या प्रतिपादनावर अमेरिका आता काय प्रतिक्रिया देणार, याविषयी उत्सुकता आहे.
नेमके काय घडले होते ?
भारताच्या वायुदलाने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर जोरदार हल्ले करुन ते उद्धवस्त केले होते. तसेच पाकिस्तानच्या वायुतळांवरही हल्ले करुन ते नष्ट केले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याधिकाऱ्याने भारताला हल्ले थांबविण्याची आणि शस्त्रसंधी करण्याची विनंती दूरध्वनीवरुन केली. भारताचे उद्दिष्ट्या तोपर्यंत पूर्ण झाले होते. त्यामुळे भारताने पाकिस्तानचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव मान्य केला. तथापि, भारत आणि पाकिस्तानने शस्त्रसंधीची घोषणा करण्यापूर्वीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेने मध्यस्थी करुन युद्ध थांबविल्याची घोषणा केली होती. मात्र, भारताने अमेरिकेच्या या प्रतिपादनाचा इन्कार करत, कोणत्याही देशाची मध्यस्थी आम्ही स्वीकारलेली नाही, ही बाब तेव्हा आणि त्यानंतरही स्पष्ट केली होती.









