कैदेतील सैनिकांची केली मुक्तता
कीव्ह/मॉस्को : रशिया आणि युक्रेनने एका महत्त्वपूर्ण करारानुसार 478 युद्धकैद्यांची सुटका केली आहे. रशियाने 230 तर युक्रेनने 248 कैदेतील सैनिकांची मुक्तता केली आहे. दोन्ही देशांदरम्यान संयुक्त अरब अमिरातच्या (युएई) मध्यस्थीने हा करार झाला आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी 203 युक्रेनियन सैनिक मायदेशी परतल्याची तर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने 248 रशियन सैनिक देशात पोहोचल्याची पुष्टी दिली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात कैदेतील सैनिकांच्या अदलाबदलीची चर्चा सुरू होती. परंतु मागील वर्षी ही चर्चा स्थगित झाली होती. सुमारे 5 महिन्यांनी सैनिकांची ही अदलाबदली झाली आहे. आमचे 200 हून अधिक सैनिक आणि नागरिक रशियाच्या कैदेतून परतले आहेत असे युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी टेलिग्रामवर पोस्ट करत म्हटले आहे.









