रत्नागिरी :
देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ राज्यांमध्ये आज 1 ऑगस्टपासून यांत्रिकी मासेमारी हंगामास प्रारंभ होणार आहे. 61 दिवसांच्या बंद़ी कालावधीनंतर आज मासेमारीचा मुहूर्त साधण्यासाठी जिल्ह्यातील मच्छीमार आतुर आहेत. त्यामुळे मासे खवय्यांची प्रतीक्षा संपणार आहे. मात्र राज्य सरकारसमोर पहिल्या दिवसापासून परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सना रोखण्याचे आव्हान असेल. त्यादृष्टीने मत्स्य विभागाला आपली यंत्रणा सज्ज ठेवावी लागणार आहे.
देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर 1 जून ते 31 जुलै हा यांत्रिक मासेमारी नौकांसाठी बंदी कालावधी असतो. गत हंगामात मे महिन्याच्या मध्यावर वादळी हवामानामुळे दहा दिवस अगोदरच कोकणातील मच्छीमारांना आपल्या नौका किनाऱ्यावर घ्याव्या लागल्या होत्या. त्यामुळे मच्छीमारांची मोठी निराशा झाली होती. मात्र नव्या मासेमारी हंगामात मोठ्या आशेने मच्छीमार लाटांवर स्वार होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात अधिकृत परवान्यांसह 2 हजार 781 नौका मासेमारीसाठी सज्ज झाल्या आहेत. त्यामध्ये यांत्रिकी 2 हजार 508 तर बिगर यांत्रिकी 273 नौकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील बंदरांमध्ये मच्छीमार बांधवांची लगबग वाढली आहे. समुद्रातील वादळी वातावरण हळूहळू शांत होत असल्याने वातावरणाचा अंदाज घेत नव्या हंगामातील मासेमारीचा प्रारंभ करण्यासाठी नौका सज्ज झाल्या आहेत.
- बेकायदेशीर नौकांना रोखा
1 ऑगस्टपासून मासेमारीस प्रारंभ झाल्यानंतर परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स राज्याच्या सागरी जलधीक्षेत्रात पहिल्या दिवसापासून घुसखोरी करतात आणि कोट्यावधी ऊपयांचे मत्स्यधन लुटून नेतात, हा आजवरचा स्थानिक मच्छीमारांचा अनुभव आहे. मात्र यंदा त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मत्स्य विभागाने आपली यंत्रणा सज्ज्ज ठेवावी. अन्यथा स्थानिक मच्छीमारांच्या हक्काचा घास हे परराज्यातील ट्रॉलर्स नेहमीप्रमाणे हिरावून नेतील, अशा भावना मच्छीमारांनी बोलून दाखवल्या. तसेच अनधिकृत पर्ससीन व एलईडी नौकांना मत्स्य विभागाने बंदरांमध्येच रोखावे. अशा अवैध नौका मासेमारीस गेल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.








