उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे आश्वासन
बेळगाव : जैन समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारमार्फत सर्व उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिले आहे. जैन अल्पसंख्याक संघर्ष समितीतर्फे सोमवारी बस्तवाड येथे विविध मागण्यांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी भेट देऊन जैन बांधवांना आश्वासन दिले आहे. जैन विकास महामंडळाची स्थापना करावी, संघ-संस्थांमध्ये जैन समाजाला प्रतिनिधीत्व मिळावे, अनुदानित खासगी शाळांमध्ये अंडी वितरण थांबवावे, यासह इतर मागण्यांसाठी बस्तवाड येथे जैन अल्पसंख्याक समितीमार्फत मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बाल कल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी भेट दिली. जैन समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यास सरकार बांधिल आहे. कित्येक वर्षांपासून रखडलेल्या समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढला जाईल, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बोलताना सांगितले.









