आरोग्य विभागाकडून गर्भवती महिला-रुग्णांची यादी तयार : आवश्यक ठिकाणी सेवा देण्यात येणार
खानापूर : तालुक्यातील भीमगड अभयारण्य तसेच दुर्गम आणि सर्वदूर अशा जंगल विभागातील गावातील गर्भवती महिला तसेच रुग्णांची यादी करण्यात आली असून जवळपास बारा गर्भवती महिलांना आरोग्य विभागाकडून स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांना पावसाळा संपेपर्यंत आवश्यक ते सहकार्य करण्यात येणार असून गरज पडल्यास त्यांना दवाखान्यात राहण्याची सोय करण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. गेल्या पावसाळ्यात आमगाव येथील महिलेला उपचारासाठी तिरडीवरुन आणण्यात आल्याची घटना देशपातळीवर गाजली होती. त्यामुळे तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांना आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधा पावसाळ्यात पुरविण्याची सूचना राज्य सरकारने केली आहे. त्या दृष्टीने खानापूर आरोग्य केंद्रामार्फत भीमगड अरण्यक्षेत्रातील तसेच अति दुर्गम भागातील रुग्णांची आणि गर्भवती महिलांची यादी करण्यात आली आहे. तसेच दुर्गम भागातील बारा गर्भवती महिलांना खानापूर आरोग्य केंद्रात हलवण्यात आले होते.
या गर्भवतींची तपासणी करण्यात आली असून या गर्भवती महिलांना खानापूर येथील शासकीय दवाखान्यात पावसाळा संपेपर्यंत राहण्याची सोय करण्यात आली आहे. अथवा शहराच्या आसपास आपल्या नातेवाईकांकडे त्यांनी रहावे, अशीही सूचना आरोग्य खात्यामार्फत करण्यात आली आहे. सध्या बारापैकी नऊ गर्भवती महिलांना पुन्हा परत पाठवण्यात आले असून तीन गर्भवती महिलांना दवाखान्यात राहण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच या वन विभागातील वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तसेच आजारानी ग्रस्त असलेल्या रुग्णांचीही यादी करण्यात आली असून त्यांना आवश्यक ते उपचार वेळोवेळी करण्यात येणार आहेत. यासाठी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, मित्र, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका यांना सूचना करण्यात आल्या आहेत. आवश्यक असल्यास रुग्णांनी खानापूर आरोग्य केंद्राशी संपर्क करण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी महेश किवडसन्नावर यांनी केले आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी महेश किवडसन्नावर म्हणाले, शासनाच्या सुचनेनुसार तालुक्यातील दुर्गम भागातील रुगणांची व गर्भवती महिलांचीही यादी केली असून त्यांच्या प्रकृतीची योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. आवश्यकता पडल्यास त्यांच्या राहण्याची सोय खानापूर आरोग्य केंद्रात केली असून पुढील दोन महिन्यासाठी त्यांची व्यवस्था खानापूर आरोग्य केंद्रात करण्यात येणार असल्याचे सांगितले.









