भारतीय समाजाचे, जीवनशैलीचे वर्णन एका शब्दात ‘उत्सव’प्रियता असेच करावे लागेल. असंख्य धर्म, परंपरा, चालीरीती, देव-देवता यांचे अस्तित्व असलेला महाकाय देश उत्सवाच्या धाग्याने आपली वीण घट्ट ठेवू शकल्याने त्यास प्राचीनता प्राप्त झाली. यामागे कारक घटक ‘उत्सव’ हाच आहे. उत्सवाच्या जोडीला खास घटना जसे निवडणुका, क्रिकेट स्पर्धा यातूनही आपली उत्सवप्रियता स्पष्ट होते.
अशा सातत्याने चालणाऱ्या उत्सवाचे, सणांचे अर्थकारणही तेवढेच महत्त्वपूर्ण व प्रभावी असून अर्थचक्र गतीमान करणारे सण, उत्सव आता राजकीय रंग प्राप्त करत असून आपल्या पारंपरिक सणांच्या जोडीला शेजारील राज्यातील सण, उत्सव साजरे करण्याचे गणित केवळ धार्मिक व सामाजिक नाही तर ते आर्थिकही आहे. त्यामुळेच संपूर्ण भारतास सणांच्या देशा असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल. अर्थात प्रत्येक चांगल्या, लाभदायी घटनेसोबत त्रासदायक, नुकसानकारक घटकही येत असतातच! उत्सवांची अतिसामाजिकता व नवतंत्राची विशेषत: ध्वनि-प्रकाश व्यवस्थेची जोड उत्सवांचे रुपांतर उपद्रवात करण्यासही कारणीभूत ठरते. त्यामुळे उत्सवांचे ‘अर्थ’ व अर्थकारण समजून घेणे महत्त्वाचे ठरते. उत्सव किंवा ‘सण’ साजरे करणे हे एखाद्या चांगल्या प्रसंगाचे, कृपाप्रसादाचे कृतज्ञता दर्शक म्हणून विविध देव-देवतांच्या नावे रुढ झालेले दिसतात. यातून भविष्यकाळातही अशीच कृपा राहावी, अडचणी, आपत्ती, रोगराई येऊ नयेत, पुरेसा पाऊस, धन-धान्य उपलब्ध व्हावे ही आदीम मानसिकता सामाजिक कृतीतून व्यक्त होते. चांगल्याचे संरक्षण, वाईटाचा विनाश करणारी अमर्याद सत्ता देव-देवताच्या रुपाने सर्वत्रच दिसतात व त्याचेच विस्तारीत, विविध रुपात दर्शन भारतीय सण-उत्सवात व्यक्त होते पण या सामाजिक सोहळ्यातून वैयक्तिक आनंदासोबत सामाजिक अर्थलाभही होत असल्याने त्याचे औचित्य टिकून आहे. सण-समारंभ यात होणारा खर्च अनेक पटीने अर्थचक्र गतीमान करतो.
सण-उत्सवाच्या निमित्ताने होणारे ‘पर्यटन’ प्रवासापासून निवासापर्यंत अनेक वस्तू व सेवांना मागणी निर्माण करते. यातून हॉटेल, प्रवासाची विविध साधने व ती उपलब्ध करून देणारी सर्व यंत्रणा यातून ‘रोजगार’ अनेक घटकांना उपलब्ध करून देते. एक प्रवासी किंवा पर्यटक 10 ते 12 लोकांना रोजगार देतो. जेथे विशिष्ट काळात जत्रा, यात्रा असते तेथे पिण्याचे पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, आपत्कालिन प्रसंगी मदतीची सोय यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विस्ताराव्या लागतात. या निमित्ताने काहीवेळा प्रथमच सुविधा निर्माण झालेल्या दिसतात. स्थानिक कारागीर, कलाकार, व्यापारी, उत्पादक यांना या निमित्ताने ग्राहक उपलब्ध होतात व काहींना वर्षभर पुरेल एवढे उत्पन्न उपलब्ध होते. वेगळ्या अर्थाने अशा यात्रा-जत्रा एखाद्यावेळी नाही झाली तरी त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. विविध प्रकारचे दागिने, कलाकुसरीच्या वस्तू ते विविध खाद्यपदार्थांचे विक्रेते यांनाही पर्वणी असते. वाहतुकीच्या साधनांची वाढती उपलब्धता, वाढलेले उत्पन्न यामुळे लाखोंच्या संख्येने पर्यटक विविध यात्रा, जत्रा यातून दिसतात. व्यापार, रोजगार यावरील अनुकूल परिणामाप्रमाणेच शेती उत्पादनास, ग्रामीण भागातील वस्तूंनाही मागणी वाढते. वर्षभर दर आठवड्यास एखादा सण येत असला तरी राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात साजरे होणारे सण जसे दुर्गापूजा, गणेशोत्सव, दसरा, दीपावली, पोंगल, ओणम, जलाकट्टी, कृष्ण जन्माष्टमी यांचे महत्त्व आर्थिक उलाढाल वाढवण्यात महत्त्वाचे आहे. अनेकवेळा उत्पन्नाच्या कमतरतेने किंवा अन्य कारणाने पुढे ढकललेली खरेदी किंवा दाबून ठेवलेली मागणी सणाच्या निमित्ताने पूर्ण केली जाते. नवे कपडे, पादत्राणे, घरे, टीव्ही, दुचाकी, चारचाकी ते अलंकार दागिनेपर्यंत सर्व काही बाजारमय होते. याच काळात अनेक सवलतींचा वर्षाव उत्पादक विक्रेते करतात. यामध्ये सेल, डिस्काऊंट, एकावर दोन फ्री, उधारीवर विक्री, (ईएमआय), कर्ज उपलब्धता यातून ग्राहकांच्या मनावर खरेदीसाठी प्रेरणा तयार केली जाते. जुना न खपलेला माल खपवण्यास अनेक युक्त्या वापरून ग्राहक काबीज केला जातो. साधारणत: 5 ते 20 टक्क्यांपर्यंत विक्री वाढ सणाच्या निमित्ताने होत असते.
कोविडच्या काळात ठप्प झालेली सणाची-उत्सवाची उलाढाल मात्र पूर्वपदावर येत असून गतवर्षीच्या तुलनेत 25 टक्क्याने वाढ झाल्याचे राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासातून दिसते. यावर्षी प्रत्यक्षातील खरेदीसोबत ऑनलाईन खरेदी वाढत असून 1240 कोटीची प्रत्यक्षातील व 800 कोटीची ऑनलाईन खरेदी केवळ 4 महिन्यात झालेली दिसते. दिवाळीनिमित्त येणारा बोनस, वेतनवाढ, महागाई भत्ता यातून येणारे उत्पन्न बाजारपेठेकडे मार्गस्थ होण्यात ‘सण’ निमित्तमात्र ठरतात. केवळ व्यापारी, उत्पादकच नव्हे तर सरकारलाही करमहसुलाच्या स्वरुपात अधिक उत्पन्न मिळवून देण्यातही योगदान आहे. जीएसटीमध्ये होणारी या काळातील वाढ 8 ते 10 टक्के इतकी मोठी आहे.
सणाच्या निमित्ताने होणाऱ्या आनंदोत्सवात अत्यंत गरीब, गरजू कटुंबांना मदत करण्याची ‘दान’ देण्याची परंपरा तेवढीच महत्त्वाची असून ‘सर्वेपि सुखिन सन्तू’ हे उद्दिष्ट साध्य करणारी आहे. यामध्ये अलीकडच्या काळात सामाजिक हितासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदतीचा ओघ सुरू करण्यातही यश येत आहे. मुस्लीम बांधवांनी ‘जकात’ स्वरुपात 2020 मध्ये 6 हजार कोटी रुपयांची मदत दिली होती! याबाबत गावोगावी असणारी मंदिरे आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी असणारी देवालये केवळ अन्नछत्रापुरते मर्यादित न राहता आपत्ती निवारण केंद्रे होण्याची व सरकारवरील परावलंबन कमी करणारी प्रभावी यंत्रणा ठरू शकते.
सण उत्सवांचा जास्त ‘अर्थलाभ’ अनेक घटकांना होतो. त्याचप्रमाणे त्याचे काही अनर्थकारी परिणामही दिसतात. पर्यटकांचा लोंढा मोठ्या प्रमाणात आल्याने अनेक सामाजिक सुविधावर प्रचंड ताण निर्माण होतो. विशेषत: पिण्याचे पाणी, राहण्याची सोय, वाहतूक यांचे प्रश्न गंभीर होतात. स्वच्छता घटल्याने अनेक आजारांचे फैलाव शक्यता वाढते. स्थानिक लोकांना अनेक वस्तू या काळात अधिक किमतीने घ्याव्या लागतात. ज्या गावाची क्षमता काही हजार लोक सामावण्याची आहे तिथे लाखोंची उपस्थिती देवालाही आश्चर्यचकित करते! रस्त्यावरील गर्दी, पार्किंगचा प्रश्न, अनेक रस्त्यावर येणारी दुकाने हे सर्व कमी पडते म्हणून प्रचंड आवाज, लेझर किरणांचा वापर आणि रुग्ण्वाहिकेसही वाट न देणारे रस्त्यावरील मंडप हे उत्सवाचे रुपांतर उपद्रवात करतात. उत्सवाचा, सणांचा आनंदोत्सव काहींच्या वाट्याला अपंगत्व, मरण निर्माण करीत असेल तर आपण सुरक्षा लक्ष्मणरेषा ओलांडत आहोत याचे भान हवे. परंतु याबाबत प्रत्येक धर्मपंथ ‘स्पर्धात्मक’ होत असून त्यावरही राजकीय खेळी करणारे नेतृत्व देवासदेखील चिंता निर्माण करणारी ठरते. यासाठी सणांचे, उत्सवाचे पावित्र्य, संयम, शिस्त व उत्तरदायित्व यातून व्यक्त होण्यात सातत्याने प्रयत्न करावे लागतील.
-प्रा. विजय ककडे








