संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजपाचा पराभव धक्कादायकच म्हणायला हवा. राज्यातील बहुचर्चित मतदारसंघांपैकी एक ही कसब्याची ओळख. 1995 पासून म्हणजेच मागची अडीच ते तीन दशके या मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व आहे. पडत्या काळातही भक्कमपणे उभा असलेला हा बालेकिल्ला पक्ष शिखरावस्थेत असल्याच्या काळात कोसळावा, हे अतर्क्य होय. अर्थात हे असे का झाले, याची मीमांसा करणे क्रमप्राप्त ठरते. कसब्यात ब्राम्हण समाजाचा प्रभाव असला, तरी तसा हा मतदारसंघ अठरापगड. तथापि, भाजपाचे खासदार गिरीश बापट यांनी त्याची अत्यंत परिश्रमपूर्वक बांधणी केली. समाजातील सर्व घटकांना सोबत घेत या मतदारसंघाचे बालेकिल्ल्यात केलेले रूपांतर हे सर्वस्वी बापट यांचेच कसब. मोठय़ा तपस्येने 28 वर्षे मजबूतीने राखलेल्या या गडाला अकस्मात तडे जाण्यास प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या कार्यकर्तृत्वाप्रमाणे स्वपक्षाचे नाकर्तेपणही कारणीभूत आहे, हे नेत्यांनी ध्यानात घ्यायला हवे. निर्णयप्रक्रियेत डावलायचे नि जागा अडचणीत आल्यावर ज्येष्ठ नेत्यास ऑक्सिजन सिलेंडरसह प्रचारात उतरवायचे, ही कुठली माणुसकी? असला प्रोफेशनलपणा आता तरी सोडायला हवा. एकीकडे चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु, हा न्याय कसब्यात टिळक कुटुंबीयांकरिता लावण्यात आला नाही. हीदेखील मोठी चूक. 2019 च्या निवडणुकीतून चंद्रकांतदादांच्या राजकीय सोयीकरिता कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापण्यात आले. त्याचा परिणाम मताधिक्यावर झाला असला, तरी या परिसरातील उच्चभू समाज भाजपाच्या पाठीशी कायम राहिला. आता कसब्यातही तेच होईल, हा नेतृत्वाचा अंदाज मात्र लोकांनी खोटा ठरविल्याचे दिसते. शनिवार, सदाशिव व नारायण पेठेतील मतदान व मतांची आकडेवारी तपासली, तर हे लक्षात येते. पक्षाच्या कठीण काळातही ब्राम्हण समाज पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला. मात्र, ऐनवेळी देवेंद्र यांना मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवले जात असेल, मेधाताईंबरोबरच टिळक कुटुंबीयांना डावलले जात असेल, तर आम्हाला गृहीत धरू नका. वेळ पडली, तर आम्ही काँग्रेसलाही मतदान करू, हेच ब्राम्हण समाजाने दाखवून दिले. त्यापासून पक्षाने आता तरी धडा घ्यायला हवा. चार वेळा स्थायी समितीची बक्षिसी मिळालेले पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी उडविलेली प्रचाराची राळ तर अभूतपूर्वच. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभा, रोड शो, अन्य स्टार प्रचारकांच्या फौजांबरोबरच साम, दाम, दंड, भेद नीतीचा इतका मुक्तहस्ते वापर झाला, की सूज्ञ मतदारास त्याची तिडीक यावी. पक्षातील नेते, नगरसेवकांनी जेथे अंग चोरून घेतले, तेथे इतरांचे काय? पक्षांतर्गत इतका असंतोष निर्माण का व्हावा, दोन-पाच नेत्यांना अधिक महत्त्व दिल्याने असे घडत नाही ना, याचाही शोध धुरिणांनी घ्यायला हवा. दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे या निवडणूक निकालातून शिंदे व त्यांच्या गटाच्या उघड झालेल्या मर्यादा. शिंदे यांच्यामागे आमदार असले, तरी शिवसैनिक नाहीत. हे यातून सप्रमाण सिद्ध झाले. स्वाभाविकच भाजपास ठाण्यापलीकडे त्यांच्यावर विसंबून राहून चालणार नाही. एखाद्या पक्षाचे आमदार फोडता येऊ शकतात. तथापि, त्यांचा जनाधार फोडता येईलच, असे नाही. फुटीमुळे उद्धवसेना बॅकफूटवर असली, तर ठाकरे ब्रँडला मानणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. हा वर्ग कसब्याप्रमाणे इतर मतदारसंघातील पक्षाचे गणितही बिघडवू शकतो, याची जाणीवही पक्षाला ठेवावी लागेल. राज ठाकरे हे पक्षावर पकड असलेले नेते मानले जातात. मात्र, त्यांना न जुमानता धंगेकरांच्या मागे एकवटण्याची मनसैनिकांनी दाखविलेली धमक, हेदेखील या निवडणुकीचे महत्त्वाचे वैशिष्टय़ होय. अर्थात याचे श्रेय धंगेकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वास द्यावे लागेल. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, वंचित एवढेच नव्हे, तर धंगेकर यांनी भाजपाचीही मते खेचली, ती त्यांच्या काम करणारा माणूस या प्रतिमेने. त्यामुळे या विजयाचे श्रेय आघाडीच्या एकजुटीइतकेच त्यांच्या या बलस्थानासही द्यावे लागते. सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉक करता-करता लोकांशी आपुलकीने संवाद साधावा, त्यांची कामे करावीत, दुचाकीवरून मतदारसंघ पिंजून काढत लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी जीवाचे रान करावे, हे त्यांचे प्लस पॉईंट. हे बेरजेचे राजकारण काँग्रेसच्या नेत्यांनी समजून घेतले पाहिजे. लोक काम पाहतात. दाम नाही, हा या निकालाचा अन्वयार्थही समजून घेतला पाहिजे. दुसरीकडे चिंचवड विधानसभेचा गड कायम राहणे, हा भाजपासाठी दिलासा म्हणता येईल. मात्र, अपक्ष राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली नसती, तर जगताप यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे नाना काटे यांनाच अधिक संधी होती, हे स्पष्ट दिसते. पक्षाच्या प्रभावक्षेत्रातील मताधिक्य घटणे, ही नक्कीच धोक्याची घंटा ठरावी. अलीकडेच विधान परिषद निवडणुकीत भाजपाची पीछेहाट झाली. आता पोटनिवडणुकीतही अपेक्षित यश न मिळाल्याने पुढचे राजकारण नक्कीच अटीतटीचे असेल. तरी काही गोष्टींपासून बोध घ्यायला हवा. यापुढे केवळ धार्मिक मुद्दय़ांवर निवडणुका जिंकता येतील, असे नाही. कसब्याचा निकाल हेच सांगतो. म्हणूनच लोकांच्या जगण्याचे मुद्दे समोर यायला वा आणायला हवेत. सर्वंकष विकासाच्या मुद्दय़ावर चर्चा व्हायला पाहिजे. हू इज धंगेकर, कोण तो धंगेकर, असा प्रश्न करीत प्रतिस्पर्ध्यास किरकोळीत काढले जाऊ नये. सर्वपक्षीयांनी हे ध्यानात घेतले पाहिजे. मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राचे राजकारण कमालीचे कर्कश्य झाले आहे. आरोप-प्रत्यारोप, आकांडतांडव, आक्रस्ताळेपणाचा अक्षरशः कळस झाला असून, राजकीय कुरघोडय़ांमध्ये सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोतच बदलू पाहत आहे. निवडणुका येतात, जातात. हार-जीतही होत असते. पण, राजकारण किळसवाणे होऊ नये, याची दक्षता समस्त लोकप्रतिनिधींनी घ्यावी.
Previous Articleभ्रष्टाचाराविरोधात सर्वोच्च न्यायालय पंतप्रधानांसमवेत
Next Article झारखंडमध्ये कोटय़वधींची रोकड जप्त
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









