मेलबर्न / वृत्तसंस्था
ऍन्ड्रय़ू मॅकडोनाल्ड यांना ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त केले गेले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्याशी 4 वर्षांचा करार केला. मॅकडोनाल्ड यापूर्वी या संघाच्या अंतरिम प्रशिक्षकपदी नियुक्त होते. यापूर्वी जस्टीन लँगर यांनी फेब्रुवारीपर्यंत अल्प कालावधीची मुदतवाढ स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत मॅकडोनाल्ड यांच्याशी संपर्क साधला होता.
‘आतापर्यंतचा प्रवास उत्तम स्वरुपाचा राहिला आहे आणि यापुढील कालावधीसाठी जी जबाबदारी सोपवली गेली, त्याबद्दल मी महत्त्वाकांक्षी आहे’, असे मॅकडोनाल्ड यांनी येथे नमूद केले. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानमध्ये 1-0 असा मालिकाविजय प्राप्त केला, त्यानंतर मॅकडोनाल्ड हेच ऑस्ट्रेलियन संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आघाडीवर होते.
व्हिक्टोरिया स्टेट व मेलबर्न रेनेगेड्स या स्थानिक संघांना 2018-19 हंगामात ऑस्ट्रेलियन प्रथमश्रेणी हंगामात जेतेपदे मिळवून दिल्यानंतर मॅकडोनाल्ड 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षण पथकात समाविष्ट झाले होते. माजी कसोटी अष्टपैलू मॅकडोनाल्ड यांनी भारतातील आयपीएल व इंग्लिश कौंटी क्रिकेट प्रँचायझीसाठी देखील काही जबाबदाऱया यशस्वीरित्या पार पाडल्या. ऑस्ट्रेलियन प्रशिक्षण पथकात दाखल झाल्यानंतर ते लँगर यांचे वरिष्ठ सहायक प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते.
कोट्स
ऑस्ट्रेलियन क्रिकेट प्रशिक्षकपदासाठी आम्ही अनेक दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या. त्यांचा दृष्टिकोन आजमावून पाहिला. त्या तुलनेत ऍन्ड्रय़ू मॅकडोनाल्ड यांचा दृष्टिकोन व त्यांचे आजवरचे योगदान अधिक लक्षवेधी, प्रभावी होते. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केले आहे.
-क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे व्यवस्थापकीय अधिकारी निक हॉकली









