पुणे / प्रतिनिधी :
देशातील अखिल भारतीय वैद्यक विज्ञान संस्था (एम्स), अभिमत विद्यापीठे, केंद्रीय विद्यापीठांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस, बीडीए, आणि बीएसस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमासाठी अखिल भारतीय 15 टक्के कोटय़ातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना येत्या 20 जुलैपासून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले असून, पहिल्या फेरीसाठीची नोंदणी प्रक्रिया 20 जुलैपासून सुरू होणार आहे.
वैद्यकीय प्रवेशांसाठी एकूण तेरा भारतीय भाषांतून नीट प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा दिलेल्या एकूण 20 लाख 36 हजार 316 विद्यार्थ्यांपैकी 11 लाख 45 हजार 976 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. समुपदेशन समितीकडून अखिल भारतीय 15 टक्के कोटय़ाअंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबवली जाते, तर उर्वरित 85 टक्के जागांवर प्रवेशासाठी संबंधित राज्यांतील यंत्रणेकडून प्रवेश दिले जातात. अखिल भारतीय कोटय़ासाठीची प्रक्रिया 20 जुलैपासून सुरू होणार आहे. पहिल्या फेरीसाठी 20 ते 25 जुलै या कालावधीत नोंदणी करता येणार आहे. समुपदेशनाच्या पहिल्या फेरीची निवड यादी 29 जुलै रोजी जाहीर करण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 31 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान वैद्यकीय संस्थांमध्ये आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील. दुसरी फेरी 9 ते 30 ऑगस्टदरम्यान होणार आहे, तर तिसरी फेरी 31 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या कालावधीत होईल. अधिक माहिती mcc.nic.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.