वृत्तसंस्था/मॉन्ट्रियल (कॅनडा)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या नॅशनल बँक खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत कॅनडाच्या व्हिक्टोरिया म्बोकोने एकेरीची अंतिम फेरी गाठताना उपांत्य सामन्यात नवव्या मानांकीत इलिना रायबाकिनाला पराभवचा धक्का दिला. आता जपानची नाओमी ओसाका आणि म्बोको यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. 18 वर्षीय म्बोकोने उपांत्य फेरीच्या सामन्यात रायबाकिनाचा 1-6, 7-5, 7-6 (7-4) असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात जपानच्या नाओमी ओसाकाने डेन्मार्कच्या 16 व्या मानांकीत क्लेरा टॉसनचे आव्हान 6-2, 7-6 (7-5) असे संपुष्टात आणले.
कझाकस्तानच्या रायबाकिनाने 2022 साली विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकली असून तिने डब्ल्यूटीए टूरवरील आतापर्यंत 9 स्पर्धा जिंकल्या आहेत. गेल्याच महिन्यात वॉशिंग्टनमध्ये झालेल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत रायबाकिनाने म्बोकोचा पराभव केला होता. पण म्बोकोने टोरँटोतील स्पर्धेत आपल्या मागील पराभवची परतफेड केली. उपांत्य फेरीच्या सामन्यात म्बोकोने 11 दुहेरी चूका केल्या. तसेच तिने मनगटाला झालेल्या दुखापतीवरही मात करुन हा सामना जिंकला. जपानची ओसाका हिने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत चार ग्रॅन्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. आता ती डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेतील आठवे तर 2019 च्या ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम जेतेपदानंतर पहिले अजिंक्यपद मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे.









