बिम्समध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन : सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
बेळगाव : जिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असणाऱ्या निवासी डॉक्टरांकडून विद्यार्थी वेतन (स्टायपेंड) वाढविण्याची मागणी करत आंदोलन हाती घेण्यात आले आहे. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी डॉक्टरांनी रुग्णालयाच्या आवारात चहा विकून आंदोलन केले. रुग्णांना मोफत चहा वाटप केला. तर सरकारकडून देण्यात येणारे वेतन चहा विक्रेत्याच्या कमाईपेक्षाही कमी आहे, असे आंदोलनाच्या माध्यमातून दर्शविण्यात आले. जिल्हा रुग्णालयामध्ये पीजी डॉक्टरांकडून गेल्या 9 दिवसांपासून स्टायपेंड वाढीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. राज्यातील निवासी डॉक्टर संघटनेकडून हे आंदोलन सुरू आहे. राज्यातील इतर सरकारी रुग्णालयांमध्ये सेवा बजावणाऱ्या निवासी डॉक्टरांचाही या आंदोलनाला पाठिंबा आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत निवासी डॉक्टरांना अत्यंत कमी स्टायपेंड देण्यात येत आहे.
सध्याच्या महागाईच्या काळात हा स्टायपेंड न परवडणारा आहे. सरकारने याची दखल घेऊन विद्यार्थी वेतन वाढ करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. बिम्समध्ये पीजी डॉक्टरांना 40 हजार विद्यार्थी वेतन देण्यात येत आहे. देशातील इतर राज्यांमध्ये 80 हजारांहून अधिक वेतन दिले जाते. कर्नाटक राज्यात विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क प्रतिवर्षी 1 लाख 40 हजाराहून अधिक आकारले जाते. तर इतर राज्यात हे शुल्क 40 ते 50 हजार आहे, अशी तफावत आहे. महागाईमुळे सरकारकडून देण्यात येणारे विद्यार्थी वेतन न परवडणारे ठरत असून इतर राज्यांप्रमाणेच विद्यार्थी वेतन देण्यात यावे, अशी मागणी निवासी डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करूनही त्या मानाने वेतन दिले जात नाही. तर या पेशापेक्षा चहावाल्याची अधिक कमाई आहे, हे दर्शविण्यासाठी डॉक्टरांकडून चहा विक्रीचे आंदोलन करण्यात आले.









