कुपवाड ड्रेनेज योजनेवरुन महापौरांचा भाजपला सवाल; महाविकास आघाडीमुळे योजना मंजूर; भाजपने श्रेयवाद करु नये
सांगली प्रतिनिधी
महापालिकेतील अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात भाजपने कुपवाड ड्रेनेज योजनेचा साधा ठरावही केला नाही. मग वचनपूर्ती कशी झाली? असा सवाल महापौर दिग्वीजय सूर्यवंशी यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेत आघाडीची सत्ता आल्यानंतरच ड्रेनेज योजनेचा आराखडा तयार करून शासनाकडे पाठविला. राज्यातील तत्कलिन महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा करत तांत्रिक, प्रशासकिय मान्यता घेतली. ही योजना मंजूर करण्यात महाविकास आघाडीचाच सिंहाचा वाटा असल्याचेही सूर्यवंशी यांनी सांगितले.
कुपवाड ड्रेनेज योजना मंजुरीनंतर भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये श्रेयाचे राजकारण सुरु झाले आहे. ही योजना मंजूर करुन भाजपने निवडणुकीत कुपवाडकरांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी यांनी सांगितले होते. याला प्रत्युत्तर देताना महापौर सूर्यवंशी म्हणाले, महापालिकेत भाजपची अडीच वर्षे सत्ता होती. या काळात कुपवाड ड्रेनेज योजनेचा साधा ठरावही भाजपला करता आला नाही. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते तत्कालीन मंत्री जयंतराव पाटील, विश्वजीत कदम, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, विशाल पाटील यांनी महापालिकेत बैठक घेत या योजनेचा आढावा घेतला.
त्यांनी योजनेचा सविस्तर आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. 25 मार्चला तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील यांनी नगरविकासखात्याची बैठक घेतली. या बैठकीलाही महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील सर्व नेते उपस्थित होते. या बैठकीत ड्रेनेज योजनेच्या प्रस्तावातील काही त्रुटी दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर 30 जून 2021 ला ड्रेनेजच्या प्रस्तावात दुरूस्ती करण्यात आली. तर 19 जुलै 2021 च्या महासभेत सर्वांनुमते ठराव करत 227 कोटींच्या योजनेला मान्यता देत शासनाकडे प्रस्ताव पाठविला. तर महाविकास आघाडीच्या सरकारने या योजनेला प्रशासकीय मंजुरी दिली होती. शिवाय राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
या काळात राज्यात सत्ताबदल झाला. त्यामुळे ही योजना मंजूर झाली नाही परंतू आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता या योजनेला अंतिम मंजुरी दिली आहे. त्यांनाही यापूर्वीच ही योजना मंजूर करण्याचे निवेदन दिले होते. त्यांनीही पक्ष न पाहता योजनेस मंजुरी दिल्याचे सांगत सूर्यवंशी म्हणाले, या योजनेचा आराखडा तयार करण्यापासून प्रशासकिय, तांत्रिक मंजुरी मिळण्यामध्ये महाविकास आघाडीचा सिंहाचा वाटा आहे. वास्तविक योजना मंजूर होण्यास वेळ लागला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असते तर आता योजनेच्या प्रत्यक्ष कामास सुरवातही झाली असती असेही सूर्यवंशी यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते संजय मेंढे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, नगरसेवक संतोष पाटील, विष्णू माने, शेडजी मोहिते, बबिता मेंढे, प्रशांत पाटील उपस्थित होते.
पाणी, ड्रेनेजचे श्रेय आमचेच
कुपवाडसाठी पाणी योजना नव्हती. त्यामुळे ड्रेनेज योजनेचा प्रस्ताव प्रलंबीत होता. त्यामुळे आधी पाणी योजना पूर्ण केली. कुपवाडकरांना दिलेला शब्द पाळला. तर ड्रेनेज योजनाही महाविकास आघाडीमुळेच मार्गी लागली. सर्व पक्षीय पदाधिकारी, नगरसेवकांचेही यामध्ये सहकार्य केले असेही महापौर सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांनी यावेळी बोलताना सांगितले.