बेळगाव : हिंदवाडी घुमटमाळ मारुती मंदिराकडून सखल भागाकडे येणाऱ्या पाण्याची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून जैसे थे होती. ही बाब लक्षात येताच बुधवारी महापौर मंगेश पवार यांनी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते व अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन पाहणी केली. विशेष करून बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यापासून ते शहापूरकडे जाणाऱ्या मार्गावर सांडपाण्याच्या समस्येसंदर्भात जातीने पाहणी केली. घुमटमाळ मारुती मंदिराकडून सखल भागाकडे आदर्श विद्यामंदिर शाळेजवळ मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचत होते. त्यातच त्या ठिकाणी जलवाहिनीला नेहमीच गळती लागलेली असते. ही समस्या गेल्या काही वर्षांपासून कायम होती. यासंदर्भात महापौर मंगेश पवार यांनी अभियंते व अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी विविध समस्यांचा पाढा महापौरांसमोर वाचून दाखवला.
सीडी व गटार बांधण्याची आवश्यकता
यावेळी रस्त्याच्या पूर्व बाजूला गटार होणे आवश्यक आहे. तसेच मोठ्या प्रमाणात घुमटमाळकडून येणाऱ्या सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी सीडी घालणे आवश्यक असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे महापौर मंगेश पवार यांनी मनपा अभियंत्यांना त्या ठिकाणी सीडी व गटार बांधण्याच्या सूचना केल्या. महापौरांनी दाखविलेल्या या तत्परतेबद्दल स्थानिक नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.









