सात दिवसांत म्हणणे मांडण्याची सूचना
बेळगाव : महापौर मंगेश पवार व नगरसेवक जयंत जाधव यांनी महापालिकेला सादर केलेली स्थावर व जंगम मिळकतीची माहिती खोटी आणि अपूर्ण असल्याची तक्रार राजकुमार टोपण्णावर यांनी मनपा आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार मनपा आयुक्तांनी याबाबतचा प्रस्ताव प्रादेशिक आयुक्तांकडे पाठविला होता. याबाबत म्हणणे मांडण्यासाठी दोघांना पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली होती. पण त्यांनी म्हणणे मांडण्यास वेळ मागितल्याने दोघांनाही सात दिवसांची वेळ वाढवून देण्यात आली आहे. गोवावेस येथील खाऊ कट्ट्यातील गाळे महापौर मंगेश पवार व नगरसेवक जयंत जाधव यांनी आपल्या पत्नींच्या नावे घेतल्याने यापूर्वीच प्रादेशिक आयुक्तांनी दोघांनाही अपात्र ठरविले आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यातच दोघांनी महापालिकेला दिलेल्या मिळकतीच्या तपशिलात खोटी आणि अपूर्ण माहिती देण्यात आली आहे, अशी तक्रार राजकुमार टोपण्णावर यांनी मनपा आयुक्तांकडे केली होती.
त्यानुसार कर्नाटक म्युनिसिपल कायदा 1976 कलम 19 नुसार मनपा आयुक्तांनी 4 जुलै रोजी प्रादेशिक आयुक्तांना प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर याबाबत पंधरा दिवसात म्हणणे मांडण्यासाठी कारणे दाखवा नोटीस मनपा आयुक्तांच्या माध्यमातून 26 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आली होती. सदर नोटीस दोघांनीही 28 ऑगस्ट रोजी स्वीकारली. आपले म्हणणे आवश्यक कागदपत्रांच्या माध्यमातून लेखी स्वरुपात पंधरा दिवसात मांडण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, दोघांनीही पंधरा दिवस वाढीव मुदत देण्याची मागणी केली होती. पण प्रादेशिक आयुक्तांनी सात दिवसात म्हणजेच 18 सप्टेंबरपर्यंत म्हणणे मांडण्यास मुदत दिली आहे. 18 सप्टेंबरपर्यंत म्हणणे न मांडल्यास तुमचे म्हणणे काही नाही असे समजून पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाईल, अशा आशयाची नोटीस 10 सप्टेंबर रोजी प्रादेशिक आयुक्तांकडून जारी करण्यात आली आहे.









