महापालिकेने व्यापाऱ्यांवर कोणताही अन्याय करू नये : अन्यथा अनेक व्यापाऱ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ
बेळगाव : बुडाने जय किसान भाजीमार्केटचा लँड युज बदल रद्द केला आहे. यानंतर महापालिकेकडून देखील परवाना रद्द करण्यासंदर्भात दबाव येईल. पण महापालिकेने व्यापाऱ्यांवर कोणताही अन्याय करू नये. अन्यथा अनेक व्यापाऱ्यांना व त्यावर अवलंबून असलेल्यांना रस्त्यावर येण्याची वेळ येईल. जी कागदपत्रे हवी आहेत, ती आम्ही देण्यास तयार आहोत. पण महापालिकेने कोणतीही कारवाई करताना विचारपूर्वक करावी, अशी मागणी जय किसान भाजीमार्केटमधील व्यापाऱ्यांनी महापौर मंगेश पवार व मनपा आयुक्त शुभा बी. यांची शुक्रवारी भेट घेऊन केली. जय किसान भाजीमार्केटमधील व्यापाऱ्यांनी यापूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत येणाऱ्या किल्ला तलावाजवळील जुन्या भाजीमार्केटमध्ये गेल्या 60 वर्षांपासून व्यवसाय केला आहे. यानंतर आता महामार्गालगत जय किसान भाजीमार्केट चालविले जात आहे. पण गेल्या काही वर्षांपासून भाजी मार्केटशी संबंध नसलेले काही जण विनाकारण त्रास देत आहेत.
जय किसान भाजीमार्केटमधील सर्व जाती-धर्माचे व पक्षाचे व्यापारी एकजुटीने व्यवसाय करत आहेत. पण राजकीय दबावापोटी भाजीमार्केटचा लँड युज बदल आदेश रद्द करण्यात आला आहे. बुडानंतर आता महापालिकेकडून भाजीमार्केटचा परवाना रद्द करण्यासंदर्भात हालचाली होऊ शकतात. पण बुडाने जो अन्याय केला आहे तो महापालिकेने करू नये. अन्यथा अनेक जणांवर गंडांतर येणार आहे. एपीएमसी भाजीमार्केटला आपला विरोध नाही. ते भाजीमार्केट सुरू राहिल्यास शेतकऱ्यांना लाभदायक ठरेल. एपीएमसीमध्ये काही जणांचे गाळे आहेत. सदर गाळेधारकाकडून भाडे वसूल केले जात होते. या सर्व बाबींचा विचार करून महापालिकेने जय किसान भाजीमार्केटवर अन्याय होणार नाही, यासाठी गांभीर्याने लक्ष द्यावे. एखाद्यावेळी आमच्यावर अन्याय झाल्यास रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही. आवश्यक कागदपत्रे देण्यास आम्ही तयार आहोत. लहानसहान प्रकरणात दोन्ही बाजूच्या लोकांना बोलावून निर्णय घेतले जातात. पण आपल्या 500 कोटींच्या भाजीमार्केटबद्दल एकतर्फी निर्णय घेण्यात आला आहे, तो योग्य नाही. आपल्यालाही बाजू मांडण्याची संधी हवी आहे, असे यावेळी जय किसान भाजीमार्केटच्या पदाधिकारी व व्यापाऱ्यांनी महापौर व मनपा आयुक्तांसमोर गाऱ्हाणे मांडले.









