बेळगाव : ऐतिहासिक शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी यांनी मनपा अधिकारी व नगरसेवकांसमवेत चित्ररथ मिरवणूक मार्गाची पाहणी केली. मार्गावरील अडथळे दूर करण्यासह कचरा उचलण्याची सूचना करण्यात आली. त्याचबरोबर महिलांची गैरसोय दूर व्हावी यासाठी ठिकठिकाणी मोबाईल टॉयलेट उभारण्याची सूचना करण्यात आली. दरवर्षी पारंपरिक पद्धतीने बेळगावात मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी केली जाते. त्यानंतर सार्वजनिक मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या नेतृत्वाखाली विविध शिवजयंती मंडळे चित्ररथ काढतात.
महाराष्ट्राच्या धर्तीवर साजरी केली जाणारी चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी गोवा, चंदगड, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विविध भागातून शिवभक्त येत असतात. रात्री सुरू होणारी चित्ररथ मिरवणूक पहाटेपर्यंत सुरू असते. त्यामुळे या काळात शिवभक्तांना चित्ररथ पाहता यावेत यासाठी दरवर्षी महापालिकेकडून विविध ठिकाणी प्रेक्षक गॅलरी उभारण्यासह मंडप व विद्युत रोषणाई केली जाते. चित्ररथ पाहण्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांना रात्री उशिरापर्यंत जेवण व इतर साहित्य मिळावे यासाठी हॉटेल्सदेखील सुरू ठेवली जातात. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, चित्ररथ शांततेत व उत्साहात पार पडावेत यासाठी पोलीस खात्याकडून चोख बंदोबस्त ठेवला जातो.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, सत्ताधारी गटनेते गिरीश धोंगडी, बांधकाम स्थायी समितीचे अध्यक्ष जयतीर्थ सौदत्ती यांच्यासह साहाय्यक पर्यावरण अभियंता हनुमंत कलादगी यांनी चित्ररथ मार्गाची पाहणी केली. काही ठिकाणी कचरा पडून होता, तो तातडीने उचल करण्यासंदर्भात सूचना केली. चित्ररथ पाहण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांची गैरसोय होऊ नये यासाठी मनपातर्फे मोबाईल टॉयलेटची सोय केल्याचे महापौर मंगेश पवार यांनी सांगितले.









