प्रादेशिक आयुक्त शेट्टण्णावर यांची माहिती
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर आणि उपमहापौर यांचा कार्यकाळ 14 फेब्रुवारी रोजी संपणार असल्याने निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. या निवडणुकीबाबत सोमवार दि. 10 रोजी सायंकाळी प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडून निवडणूक तारीख निश्चित करण्याच्या हालचाली सुरू होत्या. दि. 20 किंवा 21 फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्याचा विचार सुरू असल्याची माहिती प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टण्णावर यांनी सोमवारी ‘तरुण भारत’च्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. विद्यमान महापौर सविता कांबळे आणि उपमहापौर आनंद चव्हाण यांचा कार्यकाळ 14 फेब्रुवारी रोजी संपणार आहे.
कार्यकाळ संपण्यास अवघे चार दिवस शिल्लक असले तरी निवडणुकीची तारीख प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वांच्या नजरा निवडणुकीच्या तारखेकडे लागून राहिल्या आहेत. निवडणुकीसंदर्भातील सर्व माहिती यापूर्वीच महापालिकेच्या कौन्सिल विभागाकडून प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे. बेळगावचे प्रादेशिक आयुक्त शेट्टण्णावर यांच्याकडे विजापूर आणि बेंगळूरची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना तिन्हीकडील कारभार पाहताना अडचणी येत आहेत.
यावेळचे महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदांचे आरक्षण सामान्यपदासाठी असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. पण निवडणुकीची तारीख जाहीर न झाल्याने सर्वांच्या नजरा प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडे लागल्या आहेत. सोमवारी प्रादेशिक आयुक्त शेट्टण्णावर आपल्या कार्यालयात आले होते. त्यावेळी तरुण भारतच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन महापौर-उपमहापौर निवडणुकीबाबत विचारणा केली. त्यावेळी सोमवारी सायंकाळपर्यंत निवडणुकीची तारीख निश्चित करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 20 किंवा 21 फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यासंदर्भात हालचाली सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.









