15 फेब्रुवारी रोजी होणार निवडणूक : एकूण 65 मतदार : भाजपचे पारडे जड
बेळगाव : महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाची मुदत सोमवार दि. 5 रोजी संपली. त्यामुळे नूतन महापौर-उपमहापौरांची निवड करण्याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे. ही निवडणूक कधी जाहीर होणार? निडवणूक होणार की नाही? याचबरोबर लोकसभेची निवडणूक जाहीर झाली तर आचारसंहिता लागू झाल्यास अडचण येणार का? याबाबत चर्चा सुरू होती. मात्र प्रादेशिक आयुक्त एस. बी. शट्याण्णवर यांनी 15 फेब्रुवारी रोजी महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्याचे जाहीर केले आहे. यावेळी महापौरपदासाठी अनुसूचित महिला आरक्षण आले आहे तर उपमहापौरपद हे सर्वसामान्यासाठी आरक्षित आहे. महापौरपदासाठी सध्या असलेल्या नगरसेवकांमध्ये दोन अनुसूचित महिला आहेत. त्यामधील एका महिलेला संधी मिळणार आहे. नगरसेविका लक्ष्मी राठोड आणि सविता कांबळे या दोन महिलांना संधी आहे. महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. एकूण 35 नगरसेवक भाजपचे आहेत. याचबरोबर 2 खासदार, एक आमदार आणि एक विधान परिषद सदस्य असे एकूण 39 मतदार आहेत. काँग्रेसकडे एकूण 10 नगरसेवक आहेत. 3 आमदार असे एकूण 13 मतदार आहेत. एमआयएम 1 नगरसेवक, म. ए. समिती 3 आणि 9 अपक्ष असे एकूण 13 नगरसेवक आहेत. हे 13 नगरसेवक काँग्रेसला पाठिंबा देणार असल्यामुळे 26 मतदारांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचाच महापौर आणि उपमहापौर होणार आहे. गुरुवार दि. 15 रोजी ही निवडणूक होणार आहे. तोपर्यंत हंगामी महापौर-उपमहापौर म्हणून पूर्वीच्याच शोभा सोमणाचे आणि रेश्मा पाटील यांच्याकडे कार्यभार राहणार आहे. प्रादेशिक आयुक्तांकडून महापालिकेच्या कौन्सिल विभागाला पत्र आले असून आता निवडणूक जाहीर झाल्याने महापालिकेतील राजकारणही तापण्याची शक्यता आहे.
खासदार, आमदार मतदार
या निवडणुकीसाठी भाजपच्या खासदार मंगला अंगडी, खासदार आण्णासाहेब जोल्ले, विधान परिषद सदस्य आणि एक आमदार असे एकूण चार मतदार आहेत. तर काँग्रेसकडे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू सेठ असे तीन मतदार आहेत.










