पावसाळ्यापूर्वी समस्या मार्गी लावण्याची अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : मान्सूनपूर्व आढावा बैठक बुधवारी महापालिकेत पार पडताच महापौर, उपमहापौर व मनपा आयुक्त फिल्डवर उतरले आहेत. त्यांच्याकडून गुरुवारी किल्ला तलावाची पाहणी करण्यासह त्या ठिकाणच्या नाल्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली. पावसाळ्यात महामार्गानजीकच्या सेवा रस्त्यावर पाणी येण्यासह येथील घरांमध्ये पाणी शिरते. त्यामुळे त्या ठिकाणची लहान पाईप काढून मोठी पाईप घालण्यात यावी. जेणेकरून पाणी वाहून जाण्यास मदत होईल, अशी सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना केली. पावसाळ्यात शहरात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी मनपाकडून मान्सूनपूर्व खबरदारी घेतली जात आहे. यासंदर्भात चर्चा करून मार्ग काढण्यासाठी महापौरांनी बुधवारी सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते.
त्यावेळी उपस्थित नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील समस्या मांडल्या. विशेषकरून नाला, गटारींची सफाई करण्यासह ड्रेनेज समस्या मार्गी लावण्यासंदर्भात मागणी करण्यात आली. अनेक ठिकाणी ड्रेनेजलाईन तुंबली असल्याने त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी तातडीने शहरातील व उपनगरातील नाले व गटारींची सफाई करावी, अशी सूचना करण्यात आली. दरवर्षी पावसाळ्यात किल्ला परिसरातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरत आहे. मात्र, त्यावर अद्यापही तोडगा काढलेला नाही, असा आरोप बुधवारच्या बैठकीत केला होता. त्यानुसार त्याची तातडीने दखल घेत महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, मनपा आयुक्त शुभा बी. यांच्यासह स्थानिक नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत किल्ला तलावाला भेट देऊन पाहणी करण्यात आली. त्या ठिकाणच्या नाल्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यासंदर्भात सूचनाही करण्यात आली. यावेळी नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्यासह मनपा अधिकारी व इतर नगरसेवक उपस्थित होते.









