एअर इंडिया विमान चालकाचा अंतिम आर्त संदेश, सखोल आणि व्यापक चौकशीचा झाला प्रारंभ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गुरुवारी अहमदाबाद येथे कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानासंबंधी आता अधिक माहिती उपलब्ध झाली आहे. विमानाच्या चालकाने पाठविलेला अंतिम संदेशही प्रसिद्ध करण्यात आला आहे. या संदेशानंतर अवघ्या काही सेकंदांमध्येच हे विमान वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहावर कोसळले आणि विमानातील 241 प्रवासी मृत्यूमुखी पडले, अशी माहिती अधिकृतरित्या देण्यात आली आहे.
गुरुवारी दुपारी झालेला हा अपघात विमान अपघातांच्या इतिहासातील एक अत्यंत भीषण दुर्घटना ठरला आहे. विमानाच्या चालकाने शेवटच्या क्षणापर्यंत विमान सुरक्षित उतरविण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, तेव्हढा वेळच मिळाला नाही, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या चालकाने विमान कोसळण्यापूर्वी काही सेंकद आधी ‘मेडे मेडे…नो पॉवर…नो थ्रस्ट…गोईंग डाऊन…’ असा संदेश विमानतळावरील नियंत्रण कक्षाला पाठविला होता. तो अंतिम संदेश ठरला आणि नंतर विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटून ते काही क्षणातच कोसळले, असा घटनाक्रम आता घोषित करण्यात आलेला आहे.
उड्डाणानंतर पाचच मिनिटांमध्ये…
विमानाने अहमदाबादच्या वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन 12 जूनला दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी उड्डाण केल्यानंतर पाचच मिनिटांमध्ये त्यामध्ये मोठा बिघाड निर्माण झाला. 650 फूट उंची गाठल्यानंतर पुढची उंची त्याने पुढच्या काही क्षणात गाठणे आवश्यक होते. तथापि, विमानाची शक्ती कमी पडू लागली आणि ते अधिक उंच न जाता खाली येऊ लागले. यावेळी चालकाला संभाव्य परिणामांची जाणीव झाली आणि त्याने विमान आणि प्रवासी वाचविण्याची निकराची धडपड करण्यास प्रारंभ केला. तथापि, तोपर्यंत स्थिती त्याच्या नियंत्रणाबाहेर गेली होती. त्यामुळे त्याने आणिबाणीची स्थिती घोषित करत ‘मेडे’चा अंतिम आर्त संदेश पाठविला होता. त्यानंतर काही क्षणामध्येही ही दुर्घटना घडली, असे स्पष्ट झाले आहे. बिघाड कोणता घडला, हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.
अन्वेषण कक्षाला त्वरित सूचना
विमान चालकाचा अंतिम संदेश आल्यानंतर विमान अपघात अन्वेषण कक्षाला (एएआयबी) त्याची तत्काळ सूचना देण्यात आली. कक्षाच्या अधिकाऱ्यांनी काही दुर्घटना घडल्यानंतर काही मिनिटांमध्येच या कक्षाचे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले आणि त्यांनी माहिती संकलित करण्यास आरंभ केला. प्रथमत: विमानाची आणि ते ज्या इमारतीवर पडले, तिची आग विझविण्याकडे लक्ष देण्यात आले. प्रवाशांचे आणि इमारतीतील लोकांचे जीव वाचविण्याचा प्रयत्न करण्याला प्राधान्य देण्यात आले. तथापि, आगीच्या ज्वाळा इतक्या भडकल्या होत्या, की आग पूर्ण आटोक्यात आणल्यानंतरच पुढची पावले उचलता आली. बहुतेक प्रवाशांचा मृत्यू आगीत होरपळल्यामुळे झाला, असे आता उघड झाले आहे.
विमानांना विलंब होणे शक्य
भारतात कार्यरत असणाऱ्या सर्व बोईंग ‘ड्रीमलाईनर’ विमानांची कसून तांत्रिक तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही घोषणा मुख्य प्रवासी विमान वाहतूक संचालकांच्या कार्यालयाने केली आहे. आतापर्यंत काही विमानांची तपासणी झाली आहे. मात्र, तपासणीचे काम दक्षतापूर्वक करावे लागणार असल्याने अनेक विमानांना विलंब होण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी परिस्थिती समजून घ्यावी, असे आवाहन कार्यालयाने केले आहे. तपासणी पूर्ण झाल्याशिवाय या प्रकारच्या कोणत्याही विमानाने उड्डाण करु नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तपासणी करण्यासाठी प्रवासी विमान वाहतूक विभागाने व्यापक व्यवस्था केली आहे. तंत्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे काम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहितीही कार्यालयाने दिली आहे.
नेहमीचाच ‘लंचब्रेक’ पण…
गुरुवारचा दिवसाचा प्रारंभ बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि वसतीगृहात राहणाऱ्यांसाठी नेहमीप्रमाणेच झाला होता. विमानांचा घोंघावणारा आवाज हा त्यांच्यासाठी नवा नव्हताच. कारण हे महाविद्यालय विमानतळाजवळच आहे. तथापि, दुपारी पावणेदोन वाजण्याच्या आसपास काहीतरी भीषण घडणार आहे, याची त्यांना जाणीवच नव्हती. तशी ती असणे शक्यही नव्हते. ही साधारणपणे प्रत्येक विद्यार्थ्याच्या जेवणाची वेळ होती. त्यामुळे वसतीगृहाच्या भोजनकक्षात नेहमीप्रमाणे वर्दळ होती. मात्र, त्यानंतर 15 मिनिटांमध्येच होत्याचे नव्हते झालेले होते. दुर्घटनाग्रस्त विमान या वसतीगृहावर कोसळले होते आणि वसतीगृहाच्या इमारतीला आगीच्या ज्वाळांनी वेढले होते. साऱ्यांची पळापळ चाललेली होती. आगीच्या ज्वाळांच्या कक्षेत जे नव्हते, त्यांचे किरकोळ जखमांवर निभावले होते. मात्र, जे तेव्हढे भाग्यवान नव्हते, त्यांची जीवनयात्रा संपली होती.
संगीत दिग्दर्शकाचा शोध घेतेय कुटुंब…
महेश कलवाडिया नावाचा एक संगीत दिग्दर्शक या विमान दुर्घटनेत बेपत्ता झालेला आहे. त्याचे कुटुंबिय अत्यंत अस्वस्थ अवस्थेत त्याचा आजही शोध घेत आहेत. त्याच्यासंबंधी निश्चित माहिती अद्याप दिली न गेल्याने त्यांची अस्वस्थता वाढली आहे. महेश याचे शेवटेचे ज्ञात लोकेशन विमान कोसळले, त्या स्थानापासून 700 मीटर अंतरावर होते, असे त्याच्या मोबाईलवरुन दिसून येत आहे. त्यानंतर मात्र त्याचा कुटुंबियांची संपर्क तुटला होता. तो नेमका कोणत्या दिशेने गेला आणि त्याचा अद्याप ठावठिकाणा का लागत नाही, असा चिंतातूर प्रश्न त्याचे कुटुंबिय करीत आहेत. 12 जूनला दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी महेश त्याची पत्नी हेतल हिच्याशी मोबाईलवरीन बोलला होता. त्यानंतर पंधरा मिनिटांमध्ये त्याचा मोबाईल स्वीच ऑफ झाला. त्यानंतर त्याचा संपर्क झालेला नाही. कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली आहे. तथापि, त्याचा शोध लागलेला नाही. मोबाईलवरुन लोकेशन अचूकपणे समजत नाही, असे त्यांना सांगण्यात आले होते. त्यामुळे तो कदाचित दुर्घटनेच्या स्थानाच्या जवळ पोहचला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. महेश कलवाडिया याचे नेमके काय झाले आहे, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही









